Search This Blog

Monday, January 25, 2016

जय हिंद. जय १५ अॉगस्ट २६ जानेवारीमधला हिंदोळा.

      पंधरा अॉगस्ट, सव्वीस जानेवारी म्हटलं की शाळेपासूनचे जूने दिवस आठवतात. पंधरा दिवस आधीपासून तयारी चालू असायची. लेझीम पथक, शोभारथ असलं काहीबाही प्रत्येक शाळेच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट असायचं. कोणीतरी प्रमुख पाहूणा येऊन देशभक्तीपर अंडी टाकून जायचा. आपला देश कसा महान वैगरे, याची उजळणी व्हायची. साधारणतः पाच सहा महीन्यांच्या फरकाने येणाऱ्या त्या राष्ट्रीय उत्सवांचा हेतू फारसा समजायचा नाही. समजायचा तो उत्साह.. स्वातंत्र्यदिन - प्रजासत्ताक दिन "साजरा" करण्यातला आनंद.
       जसे दिवाळी होळी गणपती.. तसेच हे दोन दिवस. सत्यनाराणच्या पूजेला "श्रीहरी जगत्पीता, दूर करी तो व्यथा.. "वाजतं तसं इथं महेंद्रकुमार त्याच्या भरड आवाजात "भारत का रहनेवाला हूँ," असं म्हणत भारतची बात सुनवायचा.
      या सगळ्याचा जरासा उबग येऊन यावर प्रश्न पडायचा काळ त्यामानाने उशिराचा. आत्ये मामे चूलत असे तीन-चार भाऊ मी डिप्लोमाला गेल्यावर भारत सोडून इतरत्र गेले. त्यांचा परदेशी थाट काय असेल तो माहीत पडायचा नाही. पण, इतरांकडून त्यांचं जाम कवतिक व्हायचं. आपल्या महान देशातून लोकं परदेशी पळ का काढतात याची कारणं 'ब्रेन ड्रेन'विषयीच्या लेखांत असायची.
       डीग्रीनंतर मला परदेशी जाऊन शिकायचं होतं. पण, मी 'स्वदेस' मधल्या मोहन भार्गव सारखं भारतात परतणार होतो. कारण, रंग दे बसंती मधल्या आर. माधवननं सांगितलं होतं. "कोई भी देश पर्फेक्ट नही होता, उसे पर्फेक्ट बनाना पडता है".. ते परदेशी शिकायला जाणं पैशांच्या अडचणीमुळं शक्य झालं नाही. पण, याच काळात या एकाच देशात धर्म- जाती- पाती - आर्थिक परीस्थितीमुळं विभागलेले लक्षावधी देश राहतात, हे कळून चुकलं. विविधता में एकता कुठं दिसत नाही फारशी. आमच्या वागण्यात मात्र एकसूत्रता आहे. १५ अॉगस्ट , २६ जानेवारी "साजरे" करायच्या पद्धती जवळपास देशभर सारख्याच आहेत.
        "आपला देश लय भारी, आपला देश महान" या भ्रमातून बाहेर येऊन तीन-चार वर्षं झाली. त्यामुळे या भौगोलिक भागाला जरा अधिक जगण्यायोग्य बनवण्यासाठी इतिहास डावलून भविष्याकडे नजर ठेवत ३६५ दिवसातील जास्तीत जास्त दिवस धडपड करण्याचा निश्चय आपसूक केला गेला. इतिहासाच्या मढ्यावर भविष्यातील पिढ्या पोसणं फार्फार अवघडै.
       गेल्या आठवड्यात कोकणभर जागवलेल्या जलअभियानाचा हलका शीण जाणवतो आहे. झोपेचा अनुशेष भरून काढायचा आहे. त्यामुळे, उद्या छान-छान कपडे घालून, छातीवर - हातात झेंडे मिरवत अधिकृत / अनधिकृत ध्वजस्तंभांवर फडफडणाऱ्या कापडी झेंड्यांना सकाळी कडक, ढिसाळ, खणखणीत, पुचाट सॕल्यूट मारणाऱ्यांना बघायला जाणं कदाचित जमणार नाही. त्यांनी जागविलेल्या देशभक्तीतून निर्माण झालेला - फाटलेल्या कागदी झेंड्यांचा, वडापाव जीलेबीच्या पुडक्यांच्या रिकामी कागदांचा, फटाक्यांचा, चुरलेल्या हारांचा कचरा - त्या उत्साहाची साक्ष तीन-चार दिवस देईलच. सत्तावीसला सगळे आपल्या नेहमीच्या वेशात लोकलला लोंबकळत असतील, रीक्षा बससाठी झोंबत असतील. रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला प्रतिक्षिप्त क्रीया म्हणून मी तिथंच थूंकेन. त्या कचऱ्यात एखादं मरतुकडं कुत्रं आणि दोन कळकट पोरं जगण्याचा आधार शोधत असतील.
        थोडक्यात, भारताचा इतिहास महान आहे या विचारावर आपण आगामी स्वातंत्रदिनाची, मग प्रजासत्ताक दिनाची, मग पुन्हा स्वातंत्र्य दिनाची वाट पाहू.. जवळपास सत्तर वर्ष अशीच गेली. आणखी सातशे वर्षंही जातील! जय हिंद!

No comments:

Post a Comment