भटकणारे आत्मे उर्फ भूतांच्या भितीतून मुक्ती.
सन २००९-१०.
. रिलायन्समधे असताना तिरुपती - तीरूत्तानी- चेन्नई या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेलो होतो. एकटा जाण्याची पहीली वेळ नव्हती. पण, हा रस्ता जरा जास्तच सुनसान होता. १४० कि.मी च्या पट्ट्यात मोजकी शहरं हायवेला लागून होती.
दोन्ही बाजूला फिरता यावं म्हणून तीरूत्तानी जवळ आंध्रप्रदेश पर्यटन मंडळाच्या एका रेस्ट हाऊसमधे एक ऐसपैस खोली ठरवली. दिवाळीनंतरचा सुमार होता. पर्यटक जवळजवळ नव्हतेच. त्यामुळे ते भलंमोठं रेस्ट हाऊस, फक्त तिथला कर्मचारी वर्ग आणि माझी जहागिर होती. रोज सकाळ संध्याकाळ आंबवलेले दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पोटाचा गॕस चेंबर जबरदस्त कामगिरी करू लागला होता. अन्ना लोकं हवा खेळती रहावी म्हणूनच लुंग्या लावतात, असा माझा ठाम समज त्या दौऱ्यातच झाला.
सर्वेक्षणासाठी तिथल्याच लोकांना हाताशी धरून चार टिम कामाला लावल्या की आपण दोन आठवडे इकडे तिकडे हिंडून माहीती गोळा करत बसायचं, असा कार्यक्रम. कामाची ठराविक वेळ नसायची. गाड्या मोजायला बसलेली पोरं नीट काम करत आहेत की नाही ते बघायला मध्यरात्री पण एखाद चक्कर मारावी लागायची.
रीलायन्सने पैसा काम कसा करतो ते चांगलंच शिकवलं. जमवलेल्या पोरांमधून एखादा चूणचूणीत , जरा महत्वाकांक्षी पोर बघून त्याला ज्यादा पैशाचं आमिष द्यायचं, की आपले खबरी तयार. असा सगळा प्रकार होता.
रात्री चक्कर मारायला निघालो, की डोळ्यांवर आधीच पेंग असायची. त्यात गाड्यांचे लाईट्स आणि रस्त्याबाजूची झुडूपं सावल्याचे खेळ मांडायचीत. काय वाट्टेल ते भास व्हायचे. कधी त्यात हत्तीच दिसायचा, कधी एखादा चेहराच.. आणि ती!
ती म्हणजे मी ज्या खोलीत थांबलो होतो त्या खोलीतल्या चित्रात असलेली मुलगी. खोलीत सजावटीसाठी एका राजस्थानी मुलीचं पेंटींग लावलं होतं. अतिशय छान रंगवलेले भाव, बोलके डोळे बीळे.. आता फार अलंकारीक शब्द आठवत नाहीत. छानच. पण, तरीही भिती वाटायची. रात्री खोलीत येताना वाटायचं ही पोरगी 'आहट' टाईपने आत बसलेली असेल तर..?
फाटायची. शब्दशः फाटायची. पण, मग हिंमत करुन आत जायचो. रूममधून निघताना एक छोटा बल्ब चालूच ठेवून जायचो. ती बिचारी चित्रातच असायची.
दोन तीन दिवसांनी चेन्नईतून दहा एक किंगफिशर आणल्या. रूममध्ये आलो की त्या चित्राकडे न बघता एक ढोसायची आणि तोंडावर पांघरूण खेचून झोपून द्यायचं.
त्या काळात ट्रेकींग सातत्याने करायचो त्यामुळे भिती फारशी उरली नव्हती. पण, तिथे मोठं टोळकं असायचं. कॉलेजच्या काळात रूमवर एकटा राहायचो पण ते मुख्य वस्तीत घर होतं आणि रुममध्ये असं चित्र नव्हतं.
आठ-दहा दिवसात त्या मुलीची चित्रातून बाहेर पडण्याची खटपट न दिसल्याने मी जरा आणखी बिनधास्त झालो. एका रात्री अल्लू अर्जूनचा 'वरूडू' हा चित्रपट बघून आलो. दोन बीयर ढकलल्या आणि माझ्यात एकदम 'विक्राल और गबराल' मधला मामिक घुसला.
आयच्चा. आज बघतोच या भूतनीला.
मी त्या चित्रासमोर उभा राहिलो. तिसरी बीयर हातात. मी तिचं निरीक्षण करू लागलो. भिती नाहीशी होऊन ती अचानक लय भारी वाटू लागली मला. बराच वेळ एकटक पाहीलं असेल तिला.
मग माझा द ग्रेट संशयी मेंदू नशेतून जागा झाला. तो विचार करू लागला. ही खरंच बाहेर आली तर तिची उंची साधारण किती असेल? म्हणजे चित्रातल्या बाकी तपशीलाचं भूमितीय गणित मांडलं तर साडे पाच फूटांपर्यंत असू शकेल. आणि ती राजस्थानी बोलेल की तेलूगू? असे एकापेक्षा एक महागुरू विचार आदळू लागलो. अचानक वाघ झालेल्या मला ती रंगवलेल्या डोळ्यांनी बघत राहीली. तिथून निघताना मी त्या चित्राचा फोटो घेतला होता.
हा एक प्रसंग होता. जिथे मला घाबरण्याची, झालंच तर आमच्या कोकणी आवडीनूसार झपाटण्याची वैगरे संधी होती. पण, स्वतःवर ताबा मिळवून मी ती गमावली. त्यानंतर कित्येकदा तथाकथित झपाटलेल्या जागांवर मी भटकलो आहे. पण, त्यावेळी एकच विचार असतो - भूत बायचान्स आलंच तर त्याला कसं मेंटल बनवायचं. इतरांच्या मानलेल्या भूतांच्या सुदैवाने त्यांची माझी गाठभेट अद्याप पडलेली नाही.
No comments:
Post a Comment