Search This Blog

Saturday, January 2, 2016

देवाबद्दल थोडंसं.. दीर्घ!

      खूप दिवसांपासून मांडायचं होतं मला देवाबद्दल काय वाटतं ते.
     साधारणपणे सर्व धर्मांत देव ही संकल्पना आहे. त्या जोडीला आत्मा, आत्म्याला जोडून पाप, पूण्य आणि पूनर्जन्म या ही गोष्टी येतात. बौद्ध आणि जैन ही नास्तिक दर्शने परमेश्वर मानत नाहीत. पण, आत्मा-पाप-पूण्य अशा बाबींवर त्या मान्यता आधारलेल्या आहेत. यात आणखी प्रार्थना/नमाज, प्रार्थनास्थळं, उपास तापास या गोष्टींची भर घातली जाते. याला सेवा, सत्संग अशी नावं चिकटवून या सर्व पदार्थांच्या भेळीला ढोबळमानाने "अध्यात्म" म्हणतो आपण.
       याची सुरूवात कुठून झाली असेल, या विषयात खोल जाणं टाळूया. पण, उत्क्रांत होत असलेल्या माणसाला त्याच्या बुद्धीबाहेरच्या सर्व बाबींना त्याने अज्ञात अतिंद्रीय शक्तींचं लेबल लावलं आणि माणसासोबत या ही गोष्टी विकसित होत गेल्या.
     यात अलिकडचे म्हणजे चार-पाच हजार वर्षांपूर्वीचे काही जिज्ञासू मानव जाम डोकं खूपसू लागले. प्रत्यक्ष / प्रमाण/ अनुमान यांची मागणी करू लागले. यात आद्य आणि आघाडीवर होते भारतीय चार्वाक/लोकायतिक. त्यांना इतर सश्रद्ध लोक नास्तिक/ काफीर/ अॕथीस्ट म्हणू लागले.
    अगदी हल्ली, म्हणजे चार एकशे वर्षांपासून नव्या विचारधारांची संख्या वाढू लागली. वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनवे विचार ओतणारे हे प्रवाह 'विज्ञान' या एका झेंड्याखाली एकवटले आणि जोमाने वाढू लागले. मानवी इंद्रीयांच्या मर्यादा यंत्रांच्या सहाय्याने धडाधड पार होवू लागल्या आणि नव्या विचारधारांमुळे अध्यात्मावर आधारीत जम बसवलेल्या विचारधारांना खतरनाक झटके बसू लागले.
    आता ही दोन शतकं (सन १९०० ते २०९९) परावर्तनाची (transformation) म्हणूनच संघर्षाची आहेत. एकीकडे दणादण हजारो वर्षांपासूनची कोडी सोडवणाऱ्या विज्ञानाचं सुप्त/प्रकट आकर्षण तर दुसरीकडे मेंदूवर पारंपारिक विचारांचा विळखा, अशा कात्रीत सापडलेल्या पिढ्यांचे आपण प्रतिनिधी. विज्ञानाची पद्धत आणि धार्मिक शिकवण यांत प्रचंड विरोधाभास आणि फार क्वचित साम्य आहे. आपण ते इवलसं साम्य गच्च पकडून अध्यात्मासोबत विज्ञानालाही मिठीत घेऊ पहातोय आणि आपली जबरदस्त फरपट होतेय.
     आता जरा 'आत्मा' पाहूया.
     आत्मा म्हणजे काय, याच्या प्रत्येक विचारधारेच्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि यात भयानक गोंधळ आहे. आत्मा हे अभेद्य, अविनाशी तत्व आहे, असं सामान्यपणे मानलं जातं. पण ते नक्की कसं आहे याबाबत एकमत नाही. जैनांच्या मते आत्मा असं तत्व आहे जे शरीराच्या आकारानुसार स्वतःला लहान मोठं करतं. म्हणजे आत्मा हा शरीराच्या आकाराचा असतो. इतर काहींच्या मते आत्मा ही परमात्म्याशी जोडलेली त्याची सूक्ष्म प्रतिकृती आहे. आत्मा असतो कुठे आणि तो शरीर का आणि कधी सोडून जातो हे गणित या विचारधारांना आजवर सुटलेलं नाही. त्यामुळेच "पृथ्वीवरुन" त्याची हकालपट्टी स्वर्गात किंवा नरकात केली जाते. ज्यांचा ठावठिकाणासुद्धा आत्मा समर्थकांना माहीत नाही.
      आता माझा मेंदू असं म्हणतो, की जगणाऱ्या प्रत्येक सजीवात आत्मा आहे तर माझं शरीर ज्या अब्जावधी सजीव पेशींनी बनलेलं आहे, त्या प्रत्येकीत एक आत्मा असला पाहीजे. शिवाय, बाहेरून आत जाणारे जीवाणू विषाणू किटाणू हे ही सजीवच. मग ते आत्मे त्या अब्जावधी आत्म्यांना सामील होतात. पण, मग या अब्जावधींमध्ये माझा आत्मा कुठला? माझ्या ज्या पेशी मी लहानगं बाळ असताना नव्हत्या किंवा म्हातारपणात नसतील त्या पेशींची बेरीज वजाबाकी आत्म्यामध्ये होते? याचं उत्तर १००% कुठल्याच विचारधारेत नसणार आहे.
       कारण, असंख्य पेशींचा गोतावळा म्हणजे शरीर हे सत्य आधुनिक वैद्यकशास्त्राने लोकप्रिय केलं आहे. शरीर म्हणजेच मी. शरीर एक जैवरासायनिक यंत्र आहे जे विविध प्रकारच्या उर्जांनी व विद्युतप्रवाहांच्या प्रक्रीयेमुळे चालतं. त्याच्या महत्वाच्या यंत्रणा ढासळल्या की ते बंद पडतं. यालाच आपण "मृत्यू" म्हणतो. या स्पष्टीकरणामुळे आत्मा, परमात्मा, पाप-पुण्याच्या हिशोब आणि त्याला जोडून भूतयोनी, स्वर्ग नरक तसंच पुनर्जन्म या गोष्टी आपसूक बाद होतात. कुठलीही धार्मिक विचारधारा या स्पष्टीकरणाचं समर्थन करणार नाही.
     आता 'देव' या संकल्पनेकडे वळूया.
     देव ही संकल्पना आत्म्याच्या संकल्पनेपेक्षाही गोंधळाची आहे. खरं तर ती व्यक्तीगणिक बदलते असं म्हणता येईल. हिंदू वैदीक विचारधारेत परमात्मा किंवा नैसर्गिक शक्तींना देव मानण्याची प्रथा आहे आणि माणसांच्या मागण्या पुरवणं हे देवांचं कर्तव्यच आहे, अशीही मानसिकता आहे. यासाठी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ केले जात. आजचे 'नवस' हे त्याचं बदललेलं स्वरूप. एकच परमतत्व सर्वत्र असल्याच्या भावनेमुळे कुठलाही देव कुठल्याही स्वरूपात बघता येतो. स्वामी समर्थांचं लक्ष्मीरूप, किंवा दिवाळीत कोकणात बदलले जाणारे देवतांचे मुखवटे हे याचं निदर्शक. रूप पालटण्यापासून - ते - स्वच्छता हिच देवता, देव माणसातच पहावा - इथपर्यंत या कल्पनेचा विस्तार करता येतो. हिंदू धर्माचा वैचारीक विस्तार इतरांपेक्षा कित्येक योजने प्रचंड आहे. इस्लाम आणि ख्रीश्चन धर्म एकच एक देव मानतात आणि त्यांचा देव इतरांनीही मानावा यासाठी जिहाद, क्रूसेड असे घात मार्ग अवलंबतात. त्यांच्या प्रेषितांनी दाखवलेला मार्ग हा अंतिम असतो. जैन आणि बौद्ध या भारतीय विचाराधारा देव मानत नाहीत, पण देवमाणसं (तिर्थंकर/ झेन/ गुरू)  मानतात. यातील कुठल्याच विचारधारा निर्दोष नाहीत आणि त्यांना मानणाऱ्यांच्या आचार-विचारांत प्रचंड फरक सातत्याने जाणवतो.      
      माणसांत देव पहाणाऱ्या हिंदू धर्माच्या शाखांमध्ये जातियता आणि इतर भेदाभेदांचं विष पसरलेलं आहे. इस्लाम अल्लासाठी माणसं (काफीर) मारण्याला प्रवृत्त करतो, ख्रिस्ती स्त्रीयांना जबरदस्त कमी लेखत आले. जैन आणि बौद्ध या विचारधारा इतक्या काटेकोर नियमांवर आधारीत आहेत की त्यांचं शब्दशः पालन नेहमीच्या आयुष्यात अशक्यप्राय वाटावं. असा सगळा सावळागोंधळ आहे.
       माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता देवाची मागणी करते. अडचणीच्या प्रसंगी वाटणारा भावनिक आधार म्हणजे 'देव.' सुखाच्या प्रसंगात विघ्न येऊ नये म्हणून देवाची प्रार्थना केली जाते. म्हणजेच देवांनी कशाच्या तरी बदल्यात आपलं अनिश्चित - विशेषतः दुःखदायक घटनांपासून आपलं रक्षण करावं, हा सरळसोट न्याय आहे. मग ती साधी प्रार्थना असेल किंवा यज्ञयाग. नमाज असेल वा कुर्बानी. 'देव भावाचा भुकेला' वैगरे उपमा ज्यांची देवाला भन्नाट काहीतरी भेटवस्तू चढवण्याची "आर्थिक" कुवत नाही अशांसाठी बनवलेली एक समजूत काढणारी कथा आहे.
        सुरूवातीपासूनच देव आणि मानव हा देवाणघेवाणीचा व्यवहार राहीला आहे. बहुतांश प्रार्थना आणि आरत्या/भजनांची "फलश्रूती" पाहील्यास त्यात "भौतिक मागण्या"च दिसून येतात. उदा. श्रीगणेशस्तोत्र : विद्यार्थी लभते विद्याम्, धनार्थी लभते धनम्. स्तोत्र आरत्यांमधील सूप्त 'लाभवाद' आपण फारसा लक्षात घेत नाही. स्वार्थ कुठला आणि परमार्थ काय यातला फरक अतिशय पुसट आहे. यामुळेच प्रत्येकजण त्या अर्थाला आपापल्या हिशोबाप्रमाणे वाकवू शकतो.
       देवधर्म हा एक पुरातन धंदा आणि एक अवाढव्य अर्थव्यवस्था आहे. आजच्या काळात त्याचे लाभार्थी किती आणि कोण हे आकडेवारीनिशी मांडलं पाहीजे. अमूक एका नवसाला पावणाऱ्या देवतेला एका वर्षभरात किती नवस केले जातात आणि त्यातील किती सफल होतात ते शोधल्यास या दाव्यांचा खरेखोटेपणा उघड होईल.
         हे असं वास्तव असताना- जी एक शक्ती विश्वाचं संचलन करते आहे (असं आपल्याला वाटतं) ती कोण आहे? धर्म हे त्या शक्तीशी बांधीलकी दाखवण्याचे मार्ग असतील तर त्या मार्गांचा अंतिम मुक्काम कोणता आहे? धर्म नष्ट झाले तरी ती शक्ती राहीलच असं आपल्याला वाटतं. एरवी एकमेकांवर खच्चून टिकेचा भडीमार करणारे विविध धर्मांचे अनुयायी या अदृश्य शक्तीसाठी निरीश्वरवादा विरोधात एकवटतात हे एक मजेशीर चित्र आहे.
        विश्व स्वसंचलित आहे, यात गणिती सूत्रबद्धता (Order) आणि अनाकलनीय अनिश्चितता (chaos) यांच अफलातून मिश्रण पहायला मिळतं. मुळात प्रत्येक गोष्टीला एक आदी आणि एक अंत असतो असं आपल्याला वाटणारच. कारण, आपली वाढ तशाच वातावरणात झालेली आहे. म्हणूनच विश्वाचाही कोणीतरी निर्माता असणार, त्याला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आवड असणार, असं आपण गृहीत धरतो. त्याच्या भितीखातर पूजन करतो. पण, या निर्मात्याचा निर्माता कोण असा प्रश्न आपण विचारत नाही. तो अनादी अनंत आहे असं जर आपल्याला मान्य असेल तर विश्व अनादी-अनंत असायला काय हरकत आहे? असं मात्र आपण मनात आणत नाही.
देवाचं अस्तित्वच न मानणारे कित्येक लोक आयुष्य सुखात घालवतात. मग देव त्यांना मृत्यूपश्चात शिक्षा करत असेल का? निश्चितच नाही. कारण, मृत्यूपश्चात शिक्षेसाठी आत्म्यासारखं काही असावं लागेल आणि आत्मा हा प्रकारच अस्तित्वात नसतो यावर मी १००% ठाम आहे.

मग देवच नाहीय का?
याचं उत्तर द्यायला मी कचरतो. कारण, बालपणापासून आजतागायत असंख्य गोष्टी आणि भावना देव या संकल्पनेशी जोडल्या गेल्यात. देव अचानक नाकारला तर जगण्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल. जी भरायला सध्या कोणतंच साधन नाही. विशेषतः माझ्यासारखा आधीचा श्रद्धावान मनुष्य एकाएकी देवाला रिटायर नाही करू शकत. पण, मी त्याच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या कमी केल्यात. हल्ली मी काहीही मागत नाही. जे मिळतंय त्याचं काही श्रेय स्वतःला आणि काही नशिबाला (अनिश्चिततेला) देतो. पण, माझ्या आईचं म्हणणं असं असतं की तू देवाला मागण्या करून त्रास देत नाहीस म्हणून तुला तो स्वतःहून देतो. मी तिचा युक्तीवाद खोडायचा प्रयत्न करत नाही. कारण, ती स्वतः प्रयत्नवादी आहे. आपलं काम आपण करायचं, निकाल देवावर सोडायचा, असा तिचा खाक्या.
       देवाशी देवाणघेवाणीचे व्यवहार संपवत आणले असले तरी इतर कुठल्यातरी शक्तीचं अस्तित्व मी सरळसरळ नाकारत नाही. आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतावर झालेलं अलिकडचं संशोधन असं म्हणतं की, मिती (dimensions) आपल्याला दिसतात त्याहून जास्त असू शकतील. सजीवांच्या इंद्रीयांना मर्यादा आहेत. माणसाकडे सर्वात जास्त उत्क्रांत मेंदू असल्याने तो या मर्यादा ओळखून त्या "यंत्रांच्या" मदतीने पार करू शकतो. साधनेने अतिंद्रीय शक्ति मिळवता येतात हा दुष्प्रचार मी अजिबात मानत नाही. एखादी सजीव जमात अशी असू शकेल की त्यांना आपल्यापेक्षा जास्त मितीतील विचार करता येत असेल किंवा तसं जगता येत असेल. ('अवतार' किंवा 'इंटरस्टेलर' या हॉलीवूडपटांत या संकल्पना पुसटश्या मांडल्या गेल्यात.) पण, त्यांना माझ्या जीवनात फार रस असेल असं मला बिलकुल वाटत नाही. न्यूट्रीनोंसारखे कशालाही पार करून जाणारे मूलकण काही चमत्कारीक वाटणाऱ्या गोष्टीं घडायला हातभार लावत असतील. अशा हजारो शक्यता सांगता येतील. पण, त्यांचा उलगडा वैज्ञानिक चिकीत्सेतूनच व्हायला पाहीजे याबाबत मी आग्रही आहे.
        देव, अतिंद्रीय शक्ती अशा अदृश्य गोष्टी "विकणाऱ्या" लोकांपासून इतरांनी सावध राहीले पाहीजे.अनुभव / अनुभूती हे व्यक्तीसापेक्ष म्हणूनच बेभरवशी असतात. अनुभवांपेक्षा वारंवार सिद्ध करता येणाऱ्या प्रयोगांकडे आपला कल असला पाहीजे.
      झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसण्याचा भास होण्यामागची शारीरीक कारणं सन २०१५ वर्षअखेर स्पष्ट केली गेली आहेत. आतापर्यंत अमानवी वाटणारा हा प्रकार आता आपल्या समजूतीच्या आवाक्यात आला आहे. अशा हजारो अमानवी वाटणाऱ्या गोष्टींचा उलगडा करायचा तर चिकीत्सक दृष्टिकोनच पाहीजे. शरण जाण्याची अथवा लोटांगण घालण्याची वृत्ती नको.

No comments:

Post a Comment