'प्रणव धनावडे' या कल्याणच्या के.सी गांधी शाळेच्या मुलानं एका सामन्यात ३२३ चेंडूत १००९* धावांची विश्वविक्रमी खेळी करत ०५.०१.२०१६ रोजी एक नवा इतिहास रचला आहे. एका डावात सर्वाधिक धावांचा हा वैयक्तिक स्तरावर एक नवा उच्चांक आहे.
प्रणवच्या या पराक्रमाचे अख्ख्या देशाला कौतुक वाटले नसते तरच नवल. प्रणववर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सचिनसह क्रिकेट विश्वातल्या दिग्गजांनी त्याला शाबासकी दिली आहे. तर राज्य सरकारने त्याच्या पुढील शिक्षण व प्रशिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
नेहमीप्रमाणे काही चमको लोकांनी याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. पी हळद आणि हो गोरीपेक्षाही वेगवान असलेल्या - 'ह' असा उच्चार केला तरी गोरे होणारे वृत्तनिवेदक तर त्याला थेट पुढचा सचिन, महान खेळाडू वैगरे शिक्के मारून मोकळे झाले आहेत. प्रणव आता जेमतेम १५ वर्षांचा आहे आणि या खेळीने त्याच्यासमोर प्रचंड आव्हानं उभी केली आहेत.
आयपीएल सहीत इतर काही घडामोडींमुळे शुद्ध क्रिकेटला पारख्या झालेल्या भारतीयांना प्रणवमध्ये एक आशेचा किरण दिसू लागतोय तोच काही उतावळे बैल त्याला डोक्यावर घेऊन सैरावैरा पळत सुटलेत. त्याला आयपीएलच्या तमाशात सामिल करून घ्यायचीही आता चढाओढ चालू होईल. उन्मुक्त चंदसारखा गुणी युवा खेळाडू सध्या धावा करायला झगडतो आहे. आयपीएल आणि क्रिकेटच्या बाजारीकरणाला याचं सारं श्रेय.
क्रिकेटचा निस्सीम चाहता क्रिकेटवरच प्रेम करतो, क्रिकेटरवर नाही. आयपीएलला हजारो रुपयांची तिकीटं काढून जाणाऱ्यांमध्ये हौशे गवसेच जास्त असतात. अशी माणसं रसिक नाही तर चंगळखोर असतात. ते कुठेही गर्दी करू शकतात. मग तो सामना असो, रीएलीटी शो असो वा सेलेब्रीटी गरबा.
खरा क्रिकेट रसिक पहायचा तर तो कुठल्याही मैदानावर दिसतो. मुंबईत चर्चगेट जवळच्या ओव्हल मैदानावर लोखंडी गजांतून तोंड खूपसून अनोळखी खेळाडूंचा खेळ पहाणारा, काल परवा प्रणव खेळत असताना मैदानाबाहेर थांबून खेळ पहाणारा असतो खरा क्रिकेटप्रेमी. प्रणवने या रसिकांना खूप दीर्घकाळ त्याच्या फलंदाजीचा आस्वाद देण्याचा दृष्टिकोन बाळगला तर तो निश्चित सार्वकालीक महान फलंदाजांच्या मांदीयाळीत विराजमान होईल.
सचिनच्या सर्वांर्थाने भव्य ठरलेल्या कारकीर्दीचे खरे शिल्पकार म्हणजे त्याचा मोठा भाऊ अजित आणि गुरू रमाकांत आचरेकर. या दोघांनी सचिनच्या कुठल्याही खेळीचं तोंडदेखलं कौतुक न करता त्याला सतत चूका सुधारायला मदत केली.
उगवत्याला दंडवत ठोकणारी मंडळी कोणालाही उध्वस्त करू शकतात. अशा लोकांपासून त्याला पुढची दहा वर्ष तरी लांब ठेवण्याची जबाबदारी त्याचे आई-बाबा , शिक्षक , प्रशिक्षक आणि काही अंशी आपलीही आहे.
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Tuesday, January 5, 2016
प्रणवच्या १००९* धावांच्या निमित्तानं ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment