सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील एका युवकाने एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे आजवरचे जिल्ह्यातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सुरेंद्र माळकर या बेरोजगार युवकाच्या कामगिरीमुळे त्याचे सर्व भक्तगण अतिशय आनंदीत आहेत.
सुरेंद्र हा एक अतिशय बोलघेवडा व साधारण बुद्धीचा तरुण सावंतवाडीतील एका खेड्यात वाढला. शासकीय नोकरीत शिपाई म्हणून चिकटण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले परंतु त्यात त्याला यश आले नाही. "लेखी परीक्षेऐवजी बोलकी अंडी फेकायची असती तर मी नक्कीच यशस्वी ठरलो असतो", असं त्याचं म्हणणं आहे. त्याला कोकणात असलेल्या प्रथेप्रमाणे मुंबई-पुण्याकडे कामासाठी जाणे अनिवार्य होते. परंतु, ही गोष्ट मान्य नसल्याने गावालाच काहीतरी उद्योगधंदा चालू करावे असे त्याच्या मनात आले. नंतर सरकारची स्टार्टअप पॉलीसी तितकीशी दिलासादायक नसल्याचे त्याला त्याच्या मित्रांनी सांगितले. अशा अवघड परीस्थितीत एका जनमान्य स्थानिक सद्गुरुंनी त्याला शंकराचार्य पद विकत घेण्याचा सल्ला दिला. शिपाई बनण्यासाठी 'सेटींग' करता राखून ठेवलेले पैसे खर्च करून तो 'शंकराचार्य' बनला. "सरकारी नोकऱ्यांत हल्ली फार राम राहीला नाही. नेत्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने वशीला चालत. शिवाय मरणाचं काम करावं लागतं. म्हणून शंकराचार्य बनण्याचा निर्णय घेतला. सद्गुरु कृपेने यात कसलीही बाधा आली नाही," असं फार श्रद्धेने कान नाक घशाला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करत त्याने सांगितले. (यात त्याने नाकातला मेकूडही साफ केला असं आमच्या प्रतिनीधीला वाटलं.)
शंकराचार्य बनण्यासाठी झालेला खर्च सहा महीन्यांतच वसूल करून त्याने नफा कमावण्यास सुरूवात केली. एवढ्या कमी वेळात ब्रेक इव्हन पॉईंट असलेला अन्य उद्योग नसावा असं त्याचं ठाम मत आहे.
" शंकराचार्य सुरेंद्रानंद सरस्वती" असे नामाभिधान धारण केलेल्या सुरेंद्र माळकरच्या यशाने त्यांच्या भक्तगणांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सुरेंद्रच्या यशाचे गमक विचारले असता त्याने ते सांगण्यास नकार दिला.
त्याच्या मठाचा अभ्यास करणाऱ्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहीतीनुसार 'फेसबुक' व 'व्हॉटसअप' यामुळे सुरेंद्र यशस्वी झाला आहे. त्या पंचक्रोशीत इंटरनेट नसताना सुरेंद्रने कुठूनसे सॕटेलाईट कनेक्शन मिळवले आहे. त्याद्वारे व्हॉटस्अपवर येणारे फुलाफुलांनी नटलेले शुभ सकाळ टाईपचे संदेश तो भक्तगणांना "गुरूबोध" या कार्यक्रमात मोबाईल लपवून वाचून दाखवतो. मुळच्या बोलक्या स्वभावामुळे या आयत्या अंड्यांना तो उत्कृष्ट फोडणी देऊन सादर करतो. यामुळे भक्त शंकराचार्य सुरेंद्रानंदावर फार भाळले असल्याचे समजते.
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Tuesday, December 27, 2016
बेरोजगार तरूण बनला 'शंकराचार्य'. राज्यातील सर्व स्टार्टअपस् ला मागे टाकून उत्पन्नाबाबतीत जोरदार घोडदौड.
Friday, December 2, 2016
फेलोशीप
तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे?
मी मुंबई महापालीकेत सध्या कार्यरत आहे. परंतु, मी मूळ रत्नागिरी जिल्ह्याचा रहीवासी आहे. भारताच्या विकासाच्या वाटा गावांमधून जातात, असं माझं ठाम मत बनलं आहे. गावांचा विकास अस्ताव्यस्त होऊ नये, यासाठी विविध प्रकारच्या ज्ञानशाखांच्या उपयोजनाची गरज सध्या भासते. समाजात सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अमूक एक गोष्ट केली तर विकास गतिमान व सुयोग्य पद्धतीने होईल अशी संकल्पना असते. माझ्या मनातील ग्रामविकासाच्या संकल्पना आजमावून पाहण्यासाठी ग्रामविकास फेलोशीप ही एक उत्तम संधी आहे याची मला खात्री वाटते.
स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
माझं लहानपणाचा बराचसा काळ मी एका कोकणी खेड्यातील आजोळी व्यतीत केला आहे. तसंच इंजीनीअरींगच्या शैक्षणिक काळापासून बऱ्याचदा दुर्गम भागात निवासी ट्रेकींगसाठी जाण्याचेही योग आले. यावेळी पाहीलेल्या गावांच्या स्थितीत बदल घडावा असं मला नेहमी वाटत आलं. यासाठी मी माझी नोकरी सांभाळून संजय यादवराव यांच्या 'कोकणभूमी प्रतिष्ठान' ने आखलेल्या 'समृद्ध कोकण अभियान' मध्ये सहभाग घेतो. स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. राजेंद्रसिंह आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या जलचेतना मोहीमेत मी स्थापत्य अभियांत्रिकीचे ज्ञान वापरून ग्रामविकासाचे प्राथमिक आराखडे बनविण्यात माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. यात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते संगणकावरील सादरीकरण अशा सर्व बाबींचा समावेश होतो. शासकीय यंत्रणेचा अंतर्गत अनुभव ही माझी जमेची बाब आहे.
फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?
गावांचे येत्या काळात शहरीकरण अटळ आहे. परंतु, त्यात गावांचे बकालीकरण होऊ नये. ग्रामीण भागात जपल्या गेलेल्या काही शाश्वत मूल्यांचे, संस्कृतीचे व सर्वांत महत्वाचं म्हणजे निसर्गाचे संवर्धन व्हावे , ग्रामविकासाची प्रक्रीया संतुलित राहावी यासाठी एक लवचिक चौकट बनवता येईल का प्रश्नावर माझा भर आहे. एक वर्षाच्या फेलोशीपच्या काळात याबाबतचे बरेचसे ज्ञान माझ्याकडे संकलीत होईल ज्याचा लाभ शासन, ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या असलेल्या व्यक्ती व संस्थांना देणे शक्य होईल.
Wednesday, November 23, 2016
संन्याश्याची कफनी आणि विनोदी राजा.
एका महान राष्ट्रात एक अतिशय निसर्गसुंदर प्रदेश होता. दुर्गम, रमणीय डोंगर ते लखलखत्या रूपेरी वाळूचे किनारे असं सर्व काही त्या चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्याला निसर्गानं बहाल केलेलं होतं. पण, या देखण्या भूभागाला एक शाप होता. हा भाग गरीब होता. या भागातली हुशार आणि कष्टाळू तरूणाई देशाच्या इतर मायानगरीत वाहून जात असे. पावसाचं धो-धो पाणी त्या जमिनीवर फार काळ टिकत नसे. या प्रदेशाने पूर्वी फार तल्लख व चिवट सुभेदार देशाला दिले होते. पण, आता तशी परीस्थिती नव्हती.
या शापीत निसर्गरम्य भागात एक संन्यासी राहात होता. पंचावन्न वर्षांच्या या संन्याश्याने असंख्य गरीब , गरजू शिष्यांना जीवनाचा राजमार्ग दाखवला होता. त्याचे शिष्यही गुरुविषयी फार कृतज्ञता बाळगून होते.
या संन्याश्याकडे एकच जूनी कफनी होती. पण, ती कफनीही त्याला अतिशय शोभून दिसत असे. त्यातून त्याचे ७०% अंग झाकले जात असे. बाकी ३०% ची त्याला चिंता नव्हती.
त्याची किर्ती राजाने फार ऐकली होती. अचानक एके दिवशी त्याला राजाचा निरोप आला. निरोप कसला, राजाचा आदेशच जणू. "महंत, आम्ही आपली किर्ती फार ऐकून आहोत. पण, आपण तीच ती जूनी कफनी परीधान करता हे आम्हास काही पटत नाही. आपण ती जूनी कफनी ताबडतोब फेकून द्यावी. आम्ही लागलीच तुमच्यासाठी तलम रेशमी कफनी पाठवतो आहोत."
संन्यासी विचारात पडला." अरेच्च्या, ही कफनी माझ्यासाठी शुभलक्षणी आहे. जून्या राजाने मला ती दिली आहे. या कफनीच्या सोबतीने मी चार पिढ्या घडवल्या. आता ही तलम रेशमी कफनी मला हवीच आहे. पण, ही जूनी कफनी मी काही फेकायचा नाही."
त्याने ही गोष्ट त्याच्या लाडक्या शिष्यांना कळवली. राजाचा असा विचित्र आदेश ऐकून ते ही अवाक झाले. त्यांनी लगेचच चर्चेतून राजाचा आदेश कसा अयोग्य आहे, याबाबत मुद्देसूद खलीता तयार करून राजाला पाठवला. पण, राजा फारच हट्टी होता. त्याने उलट निरोप धाडला."महंत, तुम्हाला तलम रेशमी कफनीच वापरावी लागेल. जूनी वापरता येणार नाही."
संन्यासी आणि शिष्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही, राजाने तलम रेशमी कफनी स्थानिक सुभेदारांकरवी पाठवली आणि जूनी हिसकावून जाळून टाकली. संन्याशाने पाहीलं, ती मलमली कफनी फारच पारदर्शक होती. ती घातल्यावरही माणूस उघडा नागडाच वाटेल. संन्याशाने याबाबत त्याने सुभेदारांकडे विचारणा केली तर ते दरडावणीच्या स्वरात उत्तरले," हे बघ गोसावड्या, असले फालतु प्रश्न करू नको. राजाचा राजशिंपी फार कामात असतो. त्याला जेवढा वेळ मिळाला त्यात त्याने हे एवढं करून दिलं याची जाण ठेव. नाहीतर घालायला कपडाही मिळाला नसता. सगळे जूनाट कफनी, अंगरखे जाळायचे राजाचे आदेश आहेत"
त्या तलम रेशमी कफनीसोबतच राजाने देशावरचे नविन शिष्यही पाठवून दिले. संन्याश्याचा आश्रम त्या नवीन शिष्यगणांनी भरून गेला. ते विद्यार्थी अंगापिंडाने मजबूत आणि दांडगट होते. त्यांनी संन्याश्याकडील स्थानिक शिष्यांना हूसकावून लावले.
संन्यासी या धक्क्यातून आजही सावरला नाही. त्याचा जीव दांडगट विद्यार्थ्यांनी हूसकावून लावलेल्या त्या कोवळ्या विद्यार्थ्यांमधे अडकला होता.
खेळ मांडला.
हा. मी नियम समजावून सांगतो. प्रत्येकाला बॕटींग मिळाली पाहीजे. ११
१. आऊट होयपर्यंत बॕटींग.
२. एक टप्पी कॕच आऊट.
३. स्टंपच्या मागे रन्सी नायत.
मितरोssssss मी सांगतो त्या पद्धतीने खेळलाव तर बॕटींग मिळणार सगळ्यांना..
(खेळ सुरू झाल्यावर थोडा वेळाने)
धनू काळ्या आऊट होत नाय. त्याने बाकीच्यांच्या विकेट घेतलान. आजून नियम .
४. लाईटच्या वायरींच्या वरन जाईल इतका वर बॉल मारला तर आऊट.
५. टिपी रन कंपळ्सरी.. बॕटला बॉल लागला की धावायचंच.
६. चाळीच्या खिडक्यांना बॉल लागला तरी आऊट.
हं. आता खेळा.
(परत थोडा वेळाने.. धनू काळ्या आऊट होत नाय. परत नविन नियम.)
७. आता चाळीच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला लागला तर आऊट.
८. दोन टप्पी कॕच पण आऊट..
हं खेळा आता..
.
.
.
.
नियम बनत राहीले. बाकीच्यांच्या विकेट जात राहील्या, धनू काळे काही आऊट झाला नाही. संध्याकाळ झाली. खेळ संपला. तरी धनू काळे नाबाद.
Friday, August 5, 2016
अटकखिंडीत अडकलेल्या अभियंत्यांची व्यथा
महाराष्ट्रात स्थापत्य अभियांत्रिकी शिकवणाऱ्या सर्व तंत्रविद्यालयांनी आता " नेतेप्रणित विविध शासकीय घोटाळ्यांमध्ये कापण्यासाठी आयते बकरे येथे तयार करून मिळतील" अशी पाटी लावायला हरकत नाही. महाडमध्ये पूल कोसळण्याच्या घटनेचा दोष १००% अभियंत्यांच्या माथी बसणार आहे.
रस्त्यांना खड्डे पडले, करा अटक.
पूल कोसळले, करा अटक.
इमारत कोसळली, करा अटक.
पाणी येत नाही, करा अटक.
स्थापत्य अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची सर्वात जूनी व नागरी सुविधांशी थेट जोडलेली शाखा आहे. मुलभूत नागरी सोयीसुविधा पुरवण्यात स्थापत्यच्या अनेक उपशाखा (जलअभियांत्रिकी, स्ट्रक्चरल, दळणवळण अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी इ.) सतत कार्यरत असतात. निसर्गानंतर कोणी निर्माते असतील तर ते असतात स्थापत्य कलाकार. जगातील सातही आश्चर्ये स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय कौशल्यांचे नमूने आहेत. जागतिक वारसास्थळे मानल्या जाणाऱ्या वास्तू असोत की लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे, मशीदी , चर्चेस, अग्यारी.. सारं काही स्थापत्यनिर्माणेच आहेत. डॉक्टर पेशाला समाजात देवासमान मानलं जातं. राहायला घरं, दळणवळणाच्या सोयी, धरणं पाणी, वीज उपलब्ध करुन देणाऱ्या अभियंत्यांना काय मानलं जातं?
आज महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाची अवस्था काय आहे? एके काळी दर्जेदार अभियंते तयार करणाऱ्या शासकिय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचं उदाहरण घेऊया. पदविका अभ्यासादरम्यान प्रत्येक विषयासाठी शिक्षक मिळालेली माझी कदाचित शेवटची बॕच. आम्ही श्री. आट्ये यांच्या देखरेखीखाली शिकलो. २००५-०६ नंतर बहुतेक शिक्षक बदली गेले आणि नंतर त्यांची जागा घ्यायला कोणी स्थायी रूपानं आलंच नाही. श्री. हे संस्थेचेच माजी विद्यार्थी आता संस्थेच्याच माजी विद्यार्थांच्या सहाय्याने स्थापत्य शाखेचा गाडा गेली दहा वर्ष रेटत आहेत. मी रत्नागिरीत असताना मी एक टर्म शिकवलं. असेच माझे रत्नागिरीत असलेले ज्यूनियर सिनीयर आपापली कामं सांभाळून इमानदारीनं शिकवतात. पण, ते संस्थेशी असलेली बांधिलकी म्हणून. पवार सर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून न थकता प्रयत्न करत असतात. पण, नेते म्हणून मिरवणाऱ्या कोणीही या संस्थेला आवश्यक शिक्षक वर्ग, मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून फारसे कष्ट घेतलेले नाहीत. अशा वातावरणात शिकणारे विद्यार्थी खरंच किती कुशल अभियंते बनतील?
हीच अवस्था इतर शासकिय व खाजगी विद्यालयांत आहे. यात पुणे अभियांत्रिकी, वीरमाता जीजाबाई हे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद. विद्यालयांत नीट शिकता न आल्यानं या मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. नोकरी लागल्यानंतर समाजात प्रतिष्ठेनं जगायचं असतं. हाताशी दहा गुंड बाळगणाऱ्या एखाद्या पाचवी नापास नेत्याला मी अमूक काम नियमात बसत नाही, मी ते करणार नाही, असं सांगायचं धैर्य कुठून येईल? एक सामान्य ज्ञानाची परीक्षा पास करून प्रशासकीय अधिकारी म्हणून बसलेला माणूस एका भूरचना अभ्यासकाला अमूक एक डोंगर कोसळण्याची शक्यता नाही, असा अहवाल देण्यासाठी जबरदस्ती करतो , त्याचं सल्लाशुल्क अडवून ठेवतो तेव्हा काय करायचं?
मित्रांनो, नोकरी वाचवण्याच्या नादात आपण नडायचं विसरतोय आणि आगीतून फुफाट्यात पाय टाकतोय. एखादी गोष्ट नसेल येत, नसेल जमणार तर नाही म्हणणं आपल्याला शक्य होत नाही. स्वतःच्या तुमड्या भरण्यापलीकडे समाजासाठी कुठलंही ध्येय, द्रष्टेपण नसणाऱ्या अर्धशिक्षित पुढाऱ्यांचे आदेश कागदावर लिखीत नसतील तर स्विकारायचेच नाहीत, असं ठरवूनच काम केलं पाहीजे. पुरवलेल्या सुविधा कमी असतील, एखादं काम धोकादायक असेल तर ते देखील छापील स्वरूपात जाहीर करायची सवय करावी लागेल.
अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षणातही ज्ञानरचनावादाची पेरणी करावी लागेल. आपली कामं सांभाळून फुलणाऱ्या अभियंत्यांना आपण मेंटॉरींग करू शकतो का? आधुनिक संगणक, दृकश्राव्य माध्यमांतून आपण त्यांना मार्गदर्शन पुरवू शकतो का?
नेता किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणवणाऱ्या कोणत्याही अर्धवट हळकूंडाला "तांत्रिक अभ्यासाचा विषय असेल लायकीत रहा" म्हणायची ताकद हवी असेल तर किमान राज्यस्तरावर आपली एकी व आवाज पाहीजे. त्याचवेळी आपल्यातील नासक्या आंब्यांनाही आवर घालायला लागेल. नाहीतर, आपण असेच एकेकटे खिंडीत गाठले जाऊन मारले जाऊ.
Wednesday, May 11, 2016
सैराट : मराठीच्या वाटचालीत एक महत्वाचा टप्पा.
सैराटची कथा तसं बघायला गेलं तर अजिबात नवीन नाहीय. हे रसायन हिंदीवाल्यांनी तर पार घोळून घोळून कोळून प्रेक्षकांची कथा- कथानकाची चव नाहीशी होईस्तोवर बघणाऱ्यांना पाजलंय. अजय अतुलने दिलेल्या संगीतातही अधेमधे जून्या धून डोकावून जातात. कलाकार अगदी कोरे करकरीत नवीन आहेत असंही पहील्यांदा घडलेलं नाही. कथितरीत्या जातीयवाद दाखवणारा हा पहीलाच चित्रपट आहे असंही नाही. गावातल्या धेंडांचा माजोरडेपणा हजारो वेळा लोकांनी पाहीला असेल. प्रेमवीरांचा वास्तवाशी सामना झाल्यावर त्यांच्या प्रेमाला लागणारी ओहोटीदेखील कित्येकदा पाहीली. खून, मारामारी देखील.. मग आहे काय या चित्रपटात याड लागन्यासारखं?
इंग्लीशमधे Devil is in detail अशी म्हण आहे. याउलट सैराटचं सौंदर्य तपशीलात लपलंय. दोरीवर तोल सांभाळत या टोकाहून त्या टोकाशी जाणाऱ्या डोंबाऱ्याच्या मुलीच्या नजाकतीनं नागराजने व्यावसायिक आणि समांतर चित्रपट शैलीत समतोल साधलाय. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात, हे एरवी दवणीय अंडं वाटणारं वाक्य नागराजने खरं केलंय.
एकंदर सैराटच्या मांडणीविषयी किती तपशीलवार बोलू शकतो आपण? प्रत्येक फ्रेमवर आपल्याला बोलता येईल.
परश्यानं "याड लागलं" गाण्यात विहीरीत मारलेली उडी पहा. त्याचं विहीरीच्या काठावर पडलेलं पुढचं पाऊल दोन इंच मागे पुढे झालं असतं तर? पचकाच ना राव.. बघायला फार सोपं वाटतंय. प्रत्यक्ष चित्रीकरणात किती वेळा करायला लागलं असेल याची उत्सुकता आहे.
सैराट सारखं विविधांगी चित्रीकरण मी मराठीत या आधी कधीही पाहीलेलं नाही. घाटमाथा सदासर्वकाळ उजाड असतो हा शहरी समज फोल ठरवला बीटरवाडीनं. चित्रपटांच्या सेटवरचा कृत्रिमपणा कितीही केलं तरी उघडा पडतो. नागराजने समृद्ध शहरांची अस्ताव्यस्त अडगळ जराही झाकायचा प्रयत्न केला नाही आणि करमाळ्याचं सौंदर्य टिपण्यात कसर सोडली नाही. हे एक यश आहे.
सैराटमधे जातीयवाद पाहणाऱ्यांच्या पावलांचे फोटो मागवले पाहीजेत. त्यांना साष्टांग नमस्कार घालावा असं मनात आहे.
दिग्दर्शक ओरडून सांगतो आहे की हा एक स्त्रीवादी चित्रपट आहे. पटाची मांडणी त्याचा आवाज आणखीन वाढवते. आर्ची या चित्रपटाचा नायक आहे. एरवी मर्दपणाचा संकेत असलेली बुलेट दुचाकी आर्ची लिलया चालवते. ट्रॕक्टर चालवते. मुलाला मागणी घालते, त्याचं रक्षण करते. असे किती अलिखीत नियम मोडलेत तिने. सैराटमधे एकही स्त्री खल व्यक्तीरेखा नाही. हैद्राबादेत गुंडांपासूनही या प्रेमवीरांचं रक्षण एक उतारवयीन बाईच करते. पण, त्या वेळेला ती तिथं कुठंही अस्तित्वात नसलेल्या अण्णाला हाक मारते. कारण, स्त्री च्या शोषणाचा आणि रक्षणाचा ठेका पुरूषांकडेच आहे. बरं, त्या बाईचा नवरा गुलाबी प्रेमानंतरच्या खऱ्याखुऱ्या संसाराच्या ओझ्याला घाबरून पळून गेला आहे. हिने खंबीरपणे परक्या संस्कृतीत मुलाला वाढवलंय. एकटीने! काय समजतं यातून?
आर्चीची मुजोर अल्लड उमरावी राजकुमारी ते मध्यमवर्गीय संसारी बाई अशी होणारी वाटचाल पाहीली का तुम्ही? किती अडचणी असतात, राव. पहील्या वेळेला सार्वजनिक संडासाला नाक मुरडून पळालेली आर्ची नंतर रुळते की त्या जगण्यात. फार हळूहळू आर्ची आणि परश्या स्थिर संसाराकडे जातात. अन्यथा नेहमीच्या चित्रपटात चक्क एका गाण्यात भणंग माणूस मेहनत करुन श्रीमंत होतो. इथं यांच्या आयुष्यातले झगड्याचे तपशील अस्वस्थ करतात.
परशा फार प्रेमळ आहे खरा. पण कसोटीच्या क्षणी त्याचा पुरूषी अहंकार जागा होतो. भर रस्त्यात तो आर्चीचा हात पिरगाळतो, कान फोडतो. मुळात आक्रमक असलेली आर्ची प्रतिकार करत नाही. उलटा हात उगारत नाही. याच मुलीने परशाला मारहाण करणाऱ्यावर गोळी झाडली होती, हे विसरायला होतं. त्या क्षणी ती फक्त एक हतबल प्रेयसी आहे.
तिथून तिला पळुन जावंसं वाटतं. ती पळते. ट्रेनमधे बसते. पुढच्या स्थानकावर भीक मागणारं एक वयस्क जोडपं पाहून कदाचित तिला तिची परीस्थिती बरी आहे असं वाटतं. ही एक सामान्य मानवी भावना आहे. आपल्यापेक्षा दुःखी माणूस पाहील्यावर माणसाला आपल्या सुखाची जाणीव होते. ती परतते. इकडं परशाने दुःख संपवण्याचा जालीम उपाय जवळ केलेलाच असतो. पण, तो ही आत्महत्येच्या भावनेवर मात करतो. प्रेमाची ताकद यालाच म्हणतात. नायिकेसाठी पाच पन्नास गुंड शिंगावर घेण्याला फिल्मी म्हटलं जातं. हा फिल्मीपणा या वेळेला आर्चीने केलेला आहे. वास्तवात देखील स्त्री ही पुरूषापेक्षा जास्त खंबीर असते असं संशोधकांचं मत आहे.
भारतीय सिनेमाचा प्रवास मेलोड्रामा ते ड्रामा आणि आता ड्रामा ते वास्तववादी चित्रण असा होतोय ही आनंदाची गोष्ट आहे. 'कोर्ट' हे त्याचं उत्तम उदाहरण. मेलोड्रामा पटांनी कितीतरी गोष्टींच्या चूकीच्या प्रतिमा आपल्या मनात भरून ठेवल्या आहेत. पोलीस, न्यायव्यवस्था हे त्याचे मोठेच बळी. पोलीस दांडग्यांना निश्चित जरा जास्त मदत करतात. पण, जो लाळघोटेपणा मेलोड्रामा पटात दाखवला जातो तशी पद्धत निश्चित नसते. त्या बाजू सावरण्याचंही चित्रण सैराटमधे टापटीप केलेलं आहे.
आर्ची निघून गेल्यानंतर तिच्या बापाच्या मानमरातबाची झालेली वाताहत, 'अर्चना' नावाच्या त्या बंगल्याचं हरवलेलं वैभव मोजक्या सेकंदात समजून जातं. साधारण तशीच अवस्था परश्याच्या घराची. मित्रांची. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करण्याची खाज असलेला आपला समाज या गोष्टींमधेच रेंगाळतो अन् त्याचे परीणामही भोगतो. प्रेम, सेक्स, नातेसंबंध यांच्याबाबत असलेल्या हजारो अलिखीत निकषांप्रती अतिसंवेदनशीलता आपल्याला इतर कुठल्या क्षेत्रात पुढंही जाऊन देत नसते. सगळं आयुष्य यातच संपून जातं.
चित्रपटाचं संगीत गाजत असलं तरीही माझ्या दृष्टीनं पार्श्वसंगीत जबरदस्त परीणामकारक आहे. शेवटच्या दीड मिनीटात वापरली गेलेली शांतता त्या लहान मुलाचा अभिनय अधिक जीवंत करते, भयाण करते. त्या दिड मिनीटासाठी दाद कोणाला द्यायची ? हा प्रश्न सुटत नाहीय. अधिक या चित्रपटात खलनायक कोण? तात्या , प्रिन्स का आणखी कोणी? हे ही समजत नाही. तुम्हाला उत्तर मिळालं तर मला आवर्जून सांगा. हे उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये जाऊन त्या वातावरणात शिरावं लागेल. मोबाईलमधे "सैराट" पाहण्यात काही मजा नाही.
::::::::::::::++++++::::::::::::
अवांतर :
जातियवादाप्रमाणेच सैराटवर किशोरवयीन मुलांना चूकीचा संदेश दिल्याचा, चूकीचे संस्कार केल्याचा आरोप केला जातोय. सोशल मिडीयावरील एका महाशयांनी "मी देखील नववीतील एका मुलीचा बाप आहे," असा सूर धरून व्हॉटस्अपवरून रींकूसहीत सर्व पोरांना संस्कारी डोस पाजले आहेत.
माझं वय तीसच्या जवळ. म्हणजे मी डोस देणाऱ्या आणि डोस पाजल्या जाणाऱ्यांच्या मधल्या पिढीतला. माझं मत असं आहे,आज जी माझ्यापुढची पिढी , जे आता ४५-५० वर्षे वयोगटातील आहेत त्यांच्यापेक्षा माझ्या मागची पिढी (१५-२० वयोगट) जास्त हुशार आणि वास्तववादी आहे. भावनेपेक्षा विचारांनी निर्णय घेण्यास आजचे किशोर - किशोरी निश्चित शिकले आहेत. आज जे भाऊ संस्कारांचे डोस देत आहेत, त्या डोसांना बहुतांशी "अभिजन" वृत्तीचा वास आहे. माधूरीने 'हम आपके है कौन'मधे पाठ उघडी टाकून दिलेली दृश्य बरी 'फ्यामिली प्याक चित्रपट' म्हणून चघळलीत. तेव्हा संस्कार कुठे गेले होते?
चित्रपटात मूलं बंड करून पळून जातात, त्यामागची कारणं काय आहेत? मुलांशी त्या रंगबेरंगी वयात संवाद साधाल की संस्कार कराल? मुलांचे आदर्श घरातच तयार होत असतात बहुतांशी. अनुकरण करण्यातुनच त्यांची मानसिकता घडत जाते.
अगदी शालेय अभ्यासक्रमात देखील संस्कार करणारा, मुलांना 'घडवणारा' वर्तनवाद २००५ सालीच मागे पडला. मुलांच्या वैयक्तिक अभ्यासशैलीला महत्व देणाऱ्या, ती फुलवणाऱ्या ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमाची घोषणा होऊन ११ वर्ष झालीत. किती शिक्षक व पालकांनी तो समजून आत्मसात केला?
मुलांच्या वागण्यात, मित्रमैत्रीणी, मोबाईलमधील माहीतीसाठ्यात रस घेणाऱ्या तथाकथित सुजाण व जागृत पालकांनी मुलांची क्रमिक पुस्तकं उघडून तरी पाहीलीत का कधी? त्या पोरांचे अभ्यासक्रम बघाल तर डोळ्यांसमोर चिमण्या उडतील. "अभ्यास करा, अभ्यास करा" या पालूपदाच्या जोडीने आपल्या आयुष्याचं रडगाणं गाताना त्यांच्यासोबत कधी अभ्यासाला बसलात का? कधी त्यांच्या आवडी-निवडीत रस घेतलात का?
फक्त वयाने मोठे म्हणून भाषणं ठोकण्यापेक्षा मुलं जशी व्हावीत असं वाटतं तसं आधी आपण बनायचा प्रयत्न केले पाहीजेत. त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडींबाबत सुसंवाद ठेवला पाहीजे. मग, असे कितीही सैराट आले तरी मग 'सुसंस्कारी' पोरं बिघडणार नाहीत. बरं, एक अजून गोष्ट. सैराट मधे जेव्हा आर्ची परश्या सोबत प्रदीप आणि सल्या पळून जातात तेव्हा ते सल्याच्या एका नातेवाईकाकडे आसरा शोधतात. शहीद्या त्यांना म्हणतो ," काय रं. आई-बापानं तुम्हाला शिकवलं काय, तुम्ही करताय काय?"
ज्या मुलांना मराठी नीट समजत असेल तर ते यातून योग्य तो बोध घेतील, अन्यथा मुलांना कॉन्व्हेंटच्या वाळवंटात ढकलून मराठी शाळा ओस पाडणारी आणि मराठीला दोन पाऊलं मागं ढकलणारी पिढी कुठली, यावरही चिंतन करायची गरज पडणार.
Monday, May 2, 2016
नवीन चित्रपट संस्कृतीची चाहूल.
पूर्वी एखादं परीक्षण लिहीणे म्हणजे एक विशेष काम असायचं. ठराविक शिक्षण घेतलेले ठराविक लोक टिका टिप्पणी, परीक्षण, समीक्षा वैगरे लिहायचे. जसा चित्रपटसृष्टीतून विनोदी पात्रांचा जमाना गेला आणि मुख्य पात्रच विनोद, खलभूमिका असं सर्व काही साकारु लागले, तसंच लेखन क्षेत्राचंही. फेसबूक, ब्लॉग अशा तंत्रज्ञानामुळे एरवी वाचकाच्या भूमिकेत असणारेही लिहीते झाले. वर्तमानपत्र, मासिकं किंवा इतर कुठल्याही अभिव्यक्तीच्या माध्यमातली कटकट किंवा मक्तेदारी इथं लागू होत नाही. सारं काही मुक्त! ते ही अत्यल्प खर्चात. अनेक क्षेत्रांचं स्थैर्य आंतरजालावरील सुविधांनी हादरवून टाकलं आहे.
तीच परीस्थिती नागराज मंजूळेच्या तीन कलाकृतींनी विशेषतः आताच्या "सैराट" मुळे निर्माण झाली आहे. हा चित्रपट सामाजिक वास्तवावर काय भाष्य करतो यावर खूप जण बोलत आहेत. आपण दोन वेगळे मुद्दे लक्षात घेऊ सध्या. पहीला त्याचं चित्रीकरण आणि दुसरा नवीन व्यवसाय प्रारूप (Business Model)
मी अद्यापही हा चित्रपट पाहीलेला नाही. पण त्याच्या झलक फिती (trailer) वारंवार पाहील्या आहेत. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने बनलेल्या एका लघूपटाचा माझ्याकडे अनुभव आहे. वेगवान विहंगम दृष्य (उंचावरून वेगाने जाणारा कॕमेरा) टिपण्यात किती तांत्रिक ताकद वापरली जाते याचा अंदाज आहे. नागराजने याचा भरपुर वापर केला आहे. चित्रपटातील युगूलाच्या डोक्यावरून सरसरत नदीपलीकडे जात मावळत्या सूर्यावर जाणारा कॕमेरा, प्रचंड मोठ्या मैदानातील घोडेस्वारी टिपणारा कोन, दोन भल्यामोठ्या भिंतींच्या मधोमध पायऱ्यांचा समतोल साधणारा कोन निव्वळ अफलातून आहेत. भारतातील बऱ्याचशा पर्यटनासाठी प्रसिद्ध वेबसाईटवर "महाराष्ट्र एखाद्या चित्रपटात इतका सुंदर कधीही दिसला नव्हता" अशा आशयाच्या टिपण्या वाचायला मिळत आहेत. करमाळा भागात यावर्षी भरपूर पाऊस झाला तर निश्चितच पुढच्यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटन तिकडे वळेल.
दुसरा मुद्दा बीझनेस मॉडलचा. मोठ्या चित्रपट निर्माण संस्था सामान्यतः प्रथितयश कलाकारांना प्राधान्य देतात. चित्रपटाच्या कथानक आणि तांत्रिक बाजूंना दुय्यम माप दिलं जातं. लोकप्रिय अभिनेता अभिनेत्रींच्या नावावर भंगार सिनेमे विकले जातात. चित्रपट किंवा कोणताही मनोरंजन व्यवसाय हा किमान माझ्यामते एक सर्वसामान्य व्यवसाय आहे. पण, कलाकारांना उगाचच समाजात मोठेपण दिलं जातं. त्यांच्याबाबत बरंच काही बोललं, लिहीलं, चर्चिलं जातं. ज्यातून समाजाचा कोणताही फायदा होत नाही. कित्येक उपयोगी मानवी तास, स्रोत वाया जातात. नागराजने ही प्रथा सलगपणे मोडायची ठरवली असावी. भूमिकेला साजेसे अगदी नवखे चेहरे घेऊन तो त्याला हवं तसं काम काढून घेतो आहे. स्थिरावलेल्या कलाकारांच्या तारखांची सांगड घालणं, त्यांचे नखरे सहन करणं, वर चित्रपट निर्मितीच्या एकूण तरतूदींपैकी निम्म्याहून जास्त रक्कम त्यांना देणं, अशा कटकटींपासून त्याने सहज वेगळी वाट काढली आहे. हा वेळ आणि पैसा तो कथानक आणि तांत्रिक बाजूंवर खर्च करू शकतो. तेच यशाचं समीकरण असावं.
मराठी अस्मिता, निखळ मनोरंजनाच्या नावाखाली तेच ते बोजड चेहरे, बोगस अभिनय आणि कथानक, गचाळ तंत्रकौशल्य प्रेक्षकांच्या टाळक्यावर हाणणाऱ्या प्रस्थापितांना हा खणखणीत इशारा आहे. प्रेक्षकांना आवडतं म्हणून आम्ही तसं बनवतो, या पालूपदाखाली लपणाऱ्यां आणि दुसरीकडे कलात्मकता किंवा अभिजाततेच्या नावाखाली रटाळ समांतर चित्रपट बनवणाऱ्यांच्या मधे असलेल्या दरीमधून नागराज यावेळेला अलगद निसटला. 'कोर्ट'च्या चैतन्य ताम्हाणेनेही एक वेगळंच बीझनेस मॉडल सादर केलं होतं. प्रस्थापितांना धोक्याची घंटा अशी, की तो अजुनही वयाची तिशी पार करायचा आहे.
तेच तेच गुळपीठ किंवा कोल्हापूरी हेलातले संवाद , तीच ती कथानकं दाखवायचे दिवस संपले आहेत. मराठी चित्रपट चालत नाहीत, ही सबब सांगण्याआधी आपण प्रेक्षकांना थूकपट्टी करतोय का, यावर चिंतन होणं गरजेचं आहे. हिंदी आणि संलग्न (भोजपूरी इ. ) चित्रपट निर्मिती ही सर्रास सुमार दर्जाची असते. लोक कंटाळले आहेत. दर्जेदार इंग्रजी चित्रपटांचे अलीकडचे भारतातील कमाईचे आकडे पाहीले तर हिंदीवाल्यांना आकडी येईल. अशा या कोलमडणाऱ्या हिंदी उद्योगाची नक्कल करायचा प्रयत्न केला तर मराठीचाही कपाळमोक्ष व्हायचा.
मराठी अभिनेत्यांनी गरीब रहावे, असं यात मला म्हणायचं नाहीय. पण, कथानक, संगीत- पार्श्वध्वनी, चित्रतंत्र या बाबी गुंडाळून निव्वळ हिरोगिरीचा मार्ग पत्करण्याचा कर्मदरीद्रीपणा घडू नये. बरेचदा चित्रपट हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा विषय असतो, आपण फक्त 'स्टारडम' मिरवायला आहोत अशा अविर्भावात कलाकार असतात. त्याऐवजी उत्कृष्ट सांघिक कामगिरीसाठी कलाकार व इतरांनी एकत्र यावे. हिंदी चित्रपटसृष्टी निर्मितीमूल्यांच्या कोनातून कोणत्याही प्रकारे नक्कल करण्याजोगी नाही. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली आहे. मराठीच याचं नेतृत्व करणार.
अनेक उत्तम परदेशी दिग्दर्शक व निर्माते हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञ आहेत. जेम्स कॕमेरॉन हा टायटॕनीक, अवतार अशा विश्वविक्रमी चित्रपटांचा दिग्दर्शक 3D तंत्रज्ञान, पाण्याखालील चित्रीकरण अशा संशोधनांचा सह-जनक आहे. नेहमी हॉलीवूडकडून उचलेगिरी करून भारतीय चित्रपट बनवावे असा नियम नाही. नागराज अस्सल मातीचा गंध तंत्रकौशल्यात बंद करतो आहे. हे ही सैराटचं यश आहे. मराठीच्या बोलीभाषा ही मराठीची ताकद आहे. मराठी समजून घेण्यासाठी व ती आपलीशी करण्यासाठी परभाषिकांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर चित्रपट हे एक प्रभावी माध्यम ठरेल.
आर्थिक व सामाजिक स्तरावरचा कथित उच्चभ्रूपणा (VIP संस्कृती) मोडून काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तेच नागराज सिनेक्षेत्रात साधू पहातोय. त्याच्या चित्रपटातील तारे सिनेमाचा प्रभाव संपण्याच्या आधीच मूळ आयुष्यात परततात. ते "ग्लॕमर" च्या कचाट्यात सापडले नाहीत तर उत्तम. आकाश ठोसर म्हणजे सैराटच्या नायकाने 'चला हवा येवू द्या' कार्यक्रमात निलेश साबळेला छान उत्तर दिलं. "मला या क्षेत्रात करीयर करायचं नाहीय, पण अँक्टींग निश्चित करायची आहे". या क्षेत्रात पूर्णवेळ राहून करीयर करायचं म्हणजे काय-काय करावं लागतं याची त्याला जाणीव असावी.
चित्रपटांतून आपल्याला आशय, मनोरंजन, संगीत, एक दर्जेदार नवनिर्मितीचा अनुभव मिळाले पाहीजेत. स्टार्स आधीच फार झालेत. काही फार माजलेत. आता आणखी नकोत. नागराज, वाट भटकू नको, भावा.
Tuesday, March 22, 2016
एक उपटसुंभ उदाहरण.
मला उपमांचे खेळ करायला आवडत नाहीत. पण, खूप जणांना थोड्याश्या अवघड गोष्टी अलंकारीक पद्धतीने मांडलेल्या आवडतात, पटकन समजतात. म्हणून हा एक अवघडलेला प्रयत्न.
*****-----*****------*****
पृथ्वीचं पोट (भूगर्भ) हे एक बँकेचं खातं आहे. ज्यात वर्षानूवर्षांची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यान पिढ्या साठत आलेली बचत. जमीनीवर असलेलं पाणी जसं की नदी, सरोवरं ही तुमची कमाई आहे. त्यातला ३५% वाटा सूर्य नावाचं आयकर खातं कापून घेतं. तेच पुढे पावसाच्या रूपाने तुमच्या पगारासारखं परत येतं. त्यातला काही भाग तुमच्या भूगर्भातील बचत खात्यात जमा होतो. तर बराचसा भाग तुम्ही खर्च करता. आता खाणारी तोंडं वाढली (लोकसंख्या). उधळपट्टी वाढली. तसं तुम्ही बचत खातं पण बुडीत काढायला निघालात. त्या खात्यामुळे इतर जे व्याज म्हणून मिळणारे फायदे होते. (वन संपदा, तापमान नियंत्रण) ते ही कमी होऊ लागले.
पाऊस दरवर्षी पडतो. पण आपल्याला सवय काय? तर पगार झाला की पंधरा वीस दिवस मजा मारायची. शेवटचे आठ - दहा दिवस भणंगासारखं उधार उसनवारी करत फिरायचं. तीच परीस्थिती आताही आहे. जागतिक हवामान बदलामुळे पगार (पाऊस) वेळेवर व पुरेसा होईनासा झालाय. आपल्या उधळपट्टीला आवर नाही. त्यात शुद्ध पाण्याच्या जलचक्रात (पाऊस - बाष्पीभवन -पाऊस) आपण गटारं व सांडपाणी नावाचं एक वाईट कर्ज वाढवत नेतोय.
थोडक्यात, पाण्याच्या बाबतीत आपण लवकरच 'विजय माल्ल्या' होणार आहोत. तो देश सोडून पळाला. तुम्ही पृथ्वी सोडून कुठं पळणार आहात?
Thursday, March 3, 2016
दिशाहीन क्रांती
भई व्यवस्था के खिलाफ नही,
अव्यवस्था के खिलाफ लडो |
वैसे लडना झगडना आम बात है,
सब साथ मिलकर कुछ सुधार लाने की बात करें?
पर सुधार लाने के लिए सोच की जरूरत होती है,
पढाई की जरूरत होती है, लडाई की नही |
सुधार लाने के लिए सब को साथ लेकर चलना पडेगा, थोडासा रूकना पडेगा,
शायद दुष्मन (?) से भी हात मिलाना पडेगा |
हम काम करेंगे .. जंगल बचाऐंगे, कुदरत बचाऐंगे,
स्वच्छ सुंदर शेहेर बसाऐंगे,साथ साथ गाँव भी बचाऐंगे..
हरीयाली के साथ पैसोवाली खुशहाली भी लाऐंगे |
तुम तो ठेहरे क्रांतीवादी , छोडो, ये सब तुमसे ना हो पाएगा !
©ओमकार गिरकर
#Visionless
#Revolt
#JNU
#कन्हैया
Saturday, February 27, 2016
भूतकालीन चूकांची दुरूस्ती.
दुष्काळ पडलाय. भयंकर परीस्थिती आहे. सृष्टी निर्विकार आहे. पण, तुम्हाला जगायचं आहे की नाही?
"होय. आम्हाला जगायचंय."
मग पाणी मिळण्यासाठी काय कराल?
"आंदोलनं करू, मोर्चे काढू, सरकारला हैराण करू, प्रशासनाला भंडावून सोडू, मतदानावर बहीष्कार घालू, जाळपोळ करू, तोडफोड करू. "
अरे वा.. याने पाऊस पडेल? नद्या भरभरून वाहतील?
"काय माहीत.. आम्हाला तर एवढंच जमतं"
मग मरा सगळे.
"असं का बोलतो, दादा.. सांग की काय करायचं ते."
कुदळ फावडं हातात घ्या. आपल्याला जलमंदीरं बांधायची आहेत.
"जलमंदीरं म्हणजे?"
बांध, बंधारे, समतल चर..
"ते कशाला? आम्हाला तर पाणी नळातून येतं."
नळात पाणी कुठून येतं?
"कुठल्यातरी नदीतून येत असेल."
नदीत पाणी कुठून येतं?
"पावसामुळे."
बरोबर. पावसाचे महीने किती?
"चार."
मग इतर आठ महीने नदीत पाणी कुठून येणार?
"समजलं.. समजलं.. चला रे पटापट. जलमंदीरं बांधू."
हे असं महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जर पंधरा वीस वर्षांपूर्वी घडलं असतं तर आज दुष्काळ नसता. हरकत नाही. बिघडलेल्या गोष्टी कधीतरी दुरूस्त कराव्या लागतातच. चूकी कोणाची ते शोधण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर आपण काय-काय करू शकतो ते पाहू.
२००८ पासून मी सामाजिक-राजकीय क्षेत्रांमध्ये विशेष रस घेऊन वावरतो आहे. देश बऱ्यापैकी फिरून झाला आहे. जिथे फार चांगलं काही घडत नाही तिथे नक्की काय बिघाड आहे ते शोधण्याच्या प्रयत्नात मला जाणवलेल्या गोष्टी :
१. अगदी पुरातन काळापासून आपण फक्त मानवी जीवन आणि त्याचा आवाका यातच गुरफटलो आहोत. यात आपल्याला भांडणं, वाद ते युद्ध यात जबरदस्त रस आहे. मारामाऱ्या करणारा गल्लीतला भाई ते सीमेवर युद्ध करणारा सैनिक या सगळ्यांविषयी आपल्याला सुप्त / प्रकट कौतूक असतं. त्यामागच्या हेतूची फार क्वचितच पर्वा केली जाते. कमी अधिक प्रमाणात सत्ता आणि दरारा (वट) याची इच्छा आपणा सर्वांनाच असते. पण, ते मिळवण्याच्या नादात आपण व्यापक चित्र नजरेआड करतो. पाण्याचं आणि दुष्काळाचं राजकारण याच प्रेरणेमुळं केलं जातं.
२. प्रत्येक प्रश्नावर उपाय (दवा) शोधण्याआधी आपण प्रार्थनेचा (दुवा) मार्ग अनुसरतो. मग पाऊस पडावा म्हणून यज्ञ, सामूहीक नमाज , प्रार्थना सभा यांची आयोजनं केली जातात. हल्ली फेसबूक व्हॉटस्अप ट्वीटरवर डीजीटल प्रार्थना केल्या जातात. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडल्याचं सुख मिळतं. पण, त्यातून प्रत्यक्ष परीस्थितीत काडीमात्र फरक पडत नाही. कारण, वास्तवात काही घडवायचं तर आधी विचारपूर्वक सुनियोजित कृती करावी लागते. तरच प्रार्थना फळाला येतात. ही कृती कोण करणार, याबाबत इतरत्र बोटं दाखवली जातात.
३. आपल्याला वैयक्तिक ध्येय फार असतात. सामुहीक ध्येय जातीसाठी आरक्षण, सण उत्सव साजरे करणं या पलिकडे फार जात नाहीत. एक देश, एक राज्य, एक जिल्हा, एक तालूका किंवा गाव यांचं उद्दीष्ट काय असावं याचा विचार व त्यानुसार कृती घडल्याची उदाहरणं दुर्मिळच. एकटे दुकटे हिवरेबाजार किंवा राळेगणसिद्धी किंवा आसाम एक भौगोलिक सहवास म्हणून एकजूटीने आपापल्या प्रदेशाच्या विकासासाठी सरसावतात.
धर्म, पंथ, जाती, भाषा, राज्य, देश, आर्थिक स्तर या मानवनिर्मित गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टींच्या आधाराने विकास साधायचा म्हटला तर अनेक वादांना तोंड फुटतं. विशिष्ट भौगोलिक रचना व वातावरण असलेल्या भागांनी एक प्रदेश म्हणून स्वतःचा सामुदायिक विकास नियोजन करणं हे नैसर्गिकरीत्या सयुक्तिक आहे, ही गोष्ट आता आपल्या लक्षात येते आहे. या नियोजनात इतर सर्व बाबींचा सुयोग्य आदर राखून वाटचाल करण्याने बरंच काही साध्य होईल.
सध्याच्या केंद्र व राज्य शासनाने या विकेंद्रीत विकासाला लोकसहभागातून चालना देण्यासाठी उपयुक्त पावलं उचलली आहेत. ग्रामपंचायतींना थेट निधी देणं असो वा विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना असो, लोकांनी सहभागाशिवाय काहीही घडणार नाही. या कामांची परीणामकारकता वाढवणं व त्यातील श्रम, वेळ व पैसा वाचवण्यासाठी इस्रो या अवकाश संशोधन संस्थेनं "भूवन पंचायत" हे पोर्टल विकसित केलं आहे.
'मी एकटा काय करणार' अशा विवंचनेत असाल तर डॉ. राजेंद्रसिंह, बाबा आमटे, पोपटराव पवार, अण्णा हजारे या माणसांनी त्यांच्या त्यांच्या भागात घडवलेले बदल पहा. डॉ. राजेंद्रसिंह यांनी पहील्यांदा दोन माणसांना सोबत घेऊन सुरू केलेल्या कामाला नंतर अनेक माणसं जोडली गेली व त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीविना ११००० बंधाऱ्यांची बांधकामं बिनाकंत्राटी पद्धतीनं करून राजस्थानसारख्या वाळवंटात ७ नद्यांना जीवदान दिलं.
मित्रहो, जमीन/भूमी हिला आपण आई मानतो. पण आपली आई गेली कित्येक वर्ष तहानलेली आहे. तिच्या पोटातल्या पाण्याचा आपण भरमसाठ उपसा केला. पण, पावसाचं पाणी पुन्हा तिच्या पोटात भरणं विसरलो. त्यामुळे, आता तिला ताप आला आहे. तापमानवाढीचा वेग दर वर्षाला वाढतो आहे. परीणामी, आपली भावंडं असणारी कित्येक झाडं आणि सजीव प्रजाती मरण पावल्या. पावसात वाहून गेलेल्या मातीने झाडांचा आधार नष्ट झाला आणि नदी तसंच समुद्रात घुसलेल्या मातीने जलचरांचं जीवन धोक्यात आणलंय. जमिनीवर झाडं आणि छोट्याछोट्या पाणीसाठ्यांच्या अभावामुळे स्थानिक वातावरणात निर्माण होणारे ढग तयार होत नाहीत. म्हणून पावसाचं प्रमाण घटलं आहे. या कारणांनी घाटमाथ्यावर शेती आणि किनारपट्टीला मासेमारी अडचणीत आल्याने आर्थिक मंदी आणि महागाईचं सावट गडद होत आहे.
या दुष्टचक्रातून सुटका हवी तर प्रत्येकाने कामाला लागणं अत्यावश्यक आहे.
याची पूर्वतयारी:
१. आपले आदर्श व हिरो यात बदल करणं.
२. आपल्या मौजमजेच्या व प्रतिष्ठेच्या व्याख्या बदलणं.
३. वाचन व माहीती मिळवण्याच्या वृत्तीला प्रयत्नपूर्वक जोपासणं व त्यात सुधारणा करणं.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना ते यशस्वी होतील की नाही, याची शाश्वती देणं अवघड असतं. अशा उपक्रमांचं यश हे कित्येक गुंतागुंतीच्या विषयांशी जोडलेलं असतं. अशा वेळेला प्रचंड अभ्यास, उपयोगी पडणाऱ्या ओळखी पाळखी आणि संयम यांची जोपासना करावी लागते. "नेटवर्कींग" अर्थात आपल्या कार्याशी संबंधीत लोकांना आपल्याशी औपचारिक /अनौपचारिक पद्धतीने जोडून घेणं हा सामाजिक क्षेत्रात तसा दुर्लक्षित राहीलेला पैलू आहे. बहुतांश सामाजिक कार्यकर्ते एखाद्या विषयात एकेकटे झगडत असतात. यात स्वाभिमान ते स्वार्थ असं काहीही असू शकतं. यामुळे कामाच्या विस्ताराला मर्यादा येतात. काही वेळेला एका ठिकाणी यशस्वी ठरलेलं प्रारूप (Model) जसंच्या तसं अन्य ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे त्या कामाची पुनरावृत्ती केली तरी यशाची खात्री दिली जाऊ शकत नाही. इतरत्र यशस्वी झालेली सुयोग्य कार्यपद्धती उचलताना त्या-त्या ठिकाणच्या परीस्थितीला अनुकूल असणाऱ्या पावलांसाठीही जागा ठेवावी.
सामाजिक क्षेत्रात कार्य करताना संयम प्रचंड महत्वाचा असतो. एखाद्या पडीक जमिनीत जंगल उगवायचं तर कमीतकमी १५ वर्षे लागतील याची खूणगाठ मनाशी पक्की करावी. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर इतिहास घडायला काही क्षण पुरतात, भूगोल बदलायला एक तप (१२ वर्षे) खर्च करावं लागतं. शासकीय यंत्रणांशी समन्वय साधताना, निरूत्साही किंवा नकारात्मक लोकसमूहांसोबत काम करताना हा संयमच आपल्याला सकारात्मक परीणामांकडे घेऊन जाणारा मित्र ठरतो.
बऱ्याचदा आपली अशी धारणा असते की सामाजिक कार्य हे आपला कामधंदा सोडून करायचे उद्योग आहेत. परंतु, त्यात काहीच अंशी तथ्य आहे. आपल्या पोटापाण्याचा विषय वगळता इतर वेळ जो आपण मित्र किंवा नातेवाईक यांच्या सोबत अथवा असाच काही न करता दवडत असतो तो सामाजिक कामात गुंतवायचा. आपल्या आवडी-निवडी व प्राथमिकता थोड्याश्या बदलल्या ही गोष्ट सहजसाध्य होते. यात तुमचे मित्र व नातेवाईक सहभागी झाले तर कौटूंबिक व सामाजिक या दोन्हींचा झकास मेळ घातला जातो. उदाहरणार्थ, आमटे कुटूंबिय.
जर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात काम करू इच्छित असाल तर त्याचा एका विशिष्ट क्षेत्रापुरता विचार न करता सृष्टीरचने (Eco system) सारखा अभ्यास करावा व त्याप्रमाणे व्यवस्थापन करावं. जसं की एखाद्या शेतकरी समूहाने आधुनिक शेतीकडे वळण्याचं ठरवलं तर त्याला जोडधंदे व पूरक व्यवसायांची प्राथमिक मांडणी गरजेची आहे. आधुनिक शेतीसाठी लागणारी हत्यारे पुरवणे, त्यांचा मेंटेनन्स , इतर तंत्रकौशल्य पुरवणे, वाहतूक व्यवस्था उभी करणे या सर्वांचा विचार प्रकल्पामध्ये व्हायला पाहीजे.
प्रत्येकाचं एखादं वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण व कौशल्य असतं. ते वापरून आपण बरंच योगदान देऊ शकतो.
१. एखादा स्थापत्य अभियंता गावाचं सर्वेक्षण करून जल आराखडा व ग्रामविकास आराखडा बनवून देऊ शकेल.
२. एखादा माहीती तंत्रज्ञान अभियंता/ बी.एससी - एम एस्सी कंम्प्यूटर सायन्स पदवीधर गावाला वेबसाईट वा इ-कॉमर्स व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकेल.
३. एखादा यांत्रीकी अभियंता शेतकऱ्याचे श्रम कमी करू शकणारं सुटसुटीत यंत्र बनवू शकेल.
४. चार-पाच डॉक्टर एकत्र येऊन सहकारी तत्वावर ग्रामीण दवाखाना चालवू शकतील.
५. एखादा वाणिज्य शाखेचा पदवीधर अकाउंट सांभाळणे, पतपुरवठा काटेकोरपणे हाताळणे व आयकर भरणे इत्यादी सुविधा पुरवू शकेल.
६. एखादी कला किंवा वकीली क्षेत्रातील व्यक्ती सरकारी योजनांचा अभ्यास, प्रकल्प अहवाल तयार करणे इत्यादी सेवा पुरवू शकेल.
अशा पद्धतीने आपल्या अंगभूत कौशल्याचा अथवा शिक्षणाचा वापर करून सामाजिक-आर्थिक क्षेत्रात मोठे यश मिळवणारी कित्येक उदाहरणे आहेत. आदरणीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या "Target 3 billion-Innovative solutions towards sustainable development " या पुस्तकात याबद्दल तपशीलवार वाचायला मिळेल.
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक काम करतानाच सर्वांचा आर्थिक व वैयक्तिक उत्कर्ष साधणे शक्य आहे. गरज आहे अढळ इच्छाशक्तीची आणि अथक परीश्रमांची !