सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील एका युवकाने एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे आजवरचे जिल्ह्यातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सुरेंद्र माळकर या बेरोजगार युवकाच्या कामगिरीमुळे त्याचे सर्व भक्तगण अतिशय आनंदीत आहेत.
सुरेंद्र हा एक अतिशय बोलघेवडा व साधारण बुद्धीचा तरुण सावंतवाडीतील एका खेड्यात वाढला. शासकीय नोकरीत शिपाई म्हणून चिकटण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले परंतु त्यात त्याला यश आले नाही. "लेखी परीक्षेऐवजी बोलकी अंडी फेकायची असती तर मी नक्कीच यशस्वी ठरलो असतो", असं त्याचं म्हणणं आहे. त्याला कोकणात असलेल्या प्रथेप्रमाणे मुंबई-पुण्याकडे कामासाठी जाणे अनिवार्य होते. परंतु, ही गोष्ट मान्य नसल्याने गावालाच काहीतरी उद्योगधंदा चालू करावे असे त्याच्या मनात आले. नंतर सरकारची स्टार्टअप पॉलीसी तितकीशी दिलासादायक नसल्याचे त्याला त्याच्या मित्रांनी सांगितले. अशा अवघड परीस्थितीत एका जनमान्य स्थानिक सद्गुरुंनी त्याला शंकराचार्य पद विकत घेण्याचा सल्ला दिला. शिपाई बनण्यासाठी 'सेटींग' करता राखून ठेवलेले पैसे खर्च करून तो 'शंकराचार्य' बनला. "सरकारी नोकऱ्यांत हल्ली फार राम राहीला नाही. नेत्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने वशीला चालत. शिवाय मरणाचं काम करावं लागतं. म्हणून शंकराचार्य बनण्याचा निर्णय घेतला. सद्गुरु कृपेने यात कसलीही बाधा आली नाही," असं फार श्रद्धेने कान नाक घशाला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करत त्याने सांगितले. (यात त्याने नाकातला मेकूडही साफ केला असं आमच्या प्रतिनीधीला वाटलं.)
शंकराचार्य बनण्यासाठी झालेला खर्च सहा महीन्यांतच वसूल करून त्याने नफा कमावण्यास सुरूवात केली. एवढ्या कमी वेळात ब्रेक इव्हन पॉईंट असलेला अन्य उद्योग नसावा असं त्याचं ठाम मत आहे.
" शंकराचार्य सुरेंद्रानंद सरस्वती" असे नामाभिधान धारण केलेल्या सुरेंद्र माळकरच्या यशाने त्यांच्या भक्तगणांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सुरेंद्रच्या यशाचे गमक विचारले असता त्याने ते सांगण्यास नकार दिला.
त्याच्या मठाचा अभ्यास करणाऱ्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहीतीनुसार 'फेसबुक' व 'व्हॉटसअप' यामुळे सुरेंद्र यशस्वी झाला आहे. त्या पंचक्रोशीत इंटरनेट नसताना सुरेंद्रने कुठूनसे सॕटेलाईट कनेक्शन मिळवले आहे. त्याद्वारे व्हॉटस्अपवर येणारे फुलाफुलांनी नटलेले शुभ सकाळ टाईपचे संदेश तो भक्तगणांना "गुरूबोध" या कार्यक्रमात मोबाईल लपवून वाचून दाखवतो. मुळच्या बोलक्या स्वभावामुळे या आयत्या अंड्यांना तो उत्कृष्ट फोडणी देऊन सादर करतो. यामुळे भक्त शंकराचार्य सुरेंद्रानंदावर फार भाळले असल्याचे समजते.
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Tuesday, December 27, 2016
बेरोजगार तरूण बनला 'शंकराचार्य'. राज्यातील सर्व स्टार्टअपस् ला मागे टाकून उत्पन्नाबाबतीत जोरदार घोडदौड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment