Search This Blog

Friday, August 28, 2015

अखिल भारतीय मारामारी समीकरणे

++++ अखिल भारतीय मारामारी कलेक्शन++++
प्रथमच समीकरणांच्या स्वरूपात. ......
***************  ******* **************
पातळी १. कौटूंबिक

१. भाऊ X भाऊ
२. नवरा X बायको
३. सासू X सून
४. नणंद X भावजय
५. बाप X पोरं
यात अजून खूप प्रकार आहेत. जागेच्या अभावी देता येणार नाही.
---------
पातळी २. शेजार व परीसर
१. शेजारी X शेजारी
२. कुटूंब X सोसायटी
३. या गल्लीतली पोरं X त्या गल्लीतली पोरं.
४. बाईकवाला X रीक्षावाला
५. कारवाला X बाईकवाला / रिक्षावाला
६. ट्राफीक पोलीस X गाडीवाले
७. पोलीस X नागरीक
लोकल/ बस / मेट्रो
६. कल्याण/अंबरनाथ/ कर्जत इ. X डोंबीवली
७. दरवाजावर लटकणारे X गाडीत चढू पाहणारे
८. बॕगवाले X बिनाबॕगवाले
९. बसलेले X उभे राहीलेले.
१०. फर्स्ट क्लास X सेकंड क्लास X लेडीज X अपंग

यातही खूप प्रकार आहेत..
---------
पातळी ५ : व्यवसाय /कार्यालय
१. सहकारी X सहकारी
२. कर्मचारी X साहेब X साहेबाचा साहेब.... N
३. ग्राहक X विक्रेता
४. डॉक्टर X इंजिनीअर
५. पत्रकार X दर्शक
यातही शेकडो प्रकार आहेत.
----------
पातळी ३: जात /धर्म / धारणा
१. कोकणस्थ X देशस्थ
२. कोकणस्थ + देशस्थ + ( इतर सर्व) = ब्राम्हण X ब्राम्हणेतर
३. ब्राम्हण + ब्राम्हणेतर = हिंदू X मुसलमान/ बौद्ध / ख्रिस्ती
४. आस्तिक X नास्तिक/ अज्ञेयवादी/ विज्ञानवाले
५. आरक्षण X बिनाआरक्षण
६. मराठी X गुजराती /मारवाडी /भैये
७. गुजराती X मारवाडी
८. पश्चीम महाराष्ट्रीय X विदर्भ
९. शाकाहारी X मांसाहारी
यातही अनेक प्रकार आहेत.
-----------
पातळी ४ : राजकीय
यात काही सांगता येणार नाही. माणसांच्या विधानांवरुन अंदाज करायचा साधारण आज कल कुठे आहे. जूनी शिवसेना , नविन शिवसेना, भाजप, संपप्रणित भाजप, मोदी समर्थक ते गल्लीचा दादा समर्थक असे अनेक अस्पष्ट प्रकार ...
----------
"थोडक्यात, आपण स्वतः सोडून इतर कोणा ना कोणाशी काही ना काहीतरी कारणावरून भांडत असतो. "

Friday, July 31, 2015

हमीद, कुठे आहेस?

          या वर्षाच्या (सन २०१५) सुरूवातीलाच एक अत्यंत दुर्देवी घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाच्या मधे असलेल्या रस्त्यावर एका शाळकरी मुलीचा चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना बसच्या मागच्या चाकाखाली चिरडून अपघाती मृत्यू झाला. शाळा सुटण्याची वेळ होती. शेकडो मुलं या परीसरात होती. या मुलांना काही नीट समजायच्या आतच त्यांनी घाबरून गोंधळ घालायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच घटनेला सुरूवात झाली. 
         मुलीसोबत असणा-या तिच्या मैत्रीणींकडून ही बातमी आधी तिच्या घरी आणि मग सर्व शहर व ग्रामीण भागात पसरली. काहीच वेळात तिथे लोकांचा घोळका जमू लागला. कोणीतरी शिताफीने बाजूला लटकणारा बॕनर काढून मृत मुलीच्या अंगावर टाकला जेणेकरून ते भयानक दृश्य पाहून घोळके बिथरू नयेत. तोपर्यंत ही बातमी शहर पोलीस स्थानकात पोहोचली होती. आधीच अपूरा असणारा पोलीस कर्मचारी वर्ग घटनास्थळी पोहोचला. पण जमलेला घोळका पाहून त्यांनी सूज्ञपणे थोडं दूर राहून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरूवात केली. गर्दी जमा होतेय हे पाहून मार खाण्याच्या भितीने बसचे चालक-वाहक तिथून  निसटले.
          त्यावेळी माझ्या बाबांना मोतीबिंदूवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेलं होतं. डोळ्यांचा नविन विभाग जिथे आहे, तिथे मागच्या बाजूलाच हा गोंधळ चालू होता. सारे उपचारार्थी व सोबतचे लोक खिडकीजवळ जाऊन पाहू लागले होते. बाहेरील संरक्षण भिंतीमुळे आतून काहीच दिसेना. जसाजसा गोंधळ वाढत चालला तसे मी आणि माझी धाकटी बहीण घटनास्थळी गेलो. खूप गर्दी होती. शाळकरी मुलं घाबरून सैरावैरा धावत होती. काही जण कुतूहलापोटी पुढे जात. परत घाबरून मागे धावत येत. मी आणि बहीण थोडं पुढे गेलो. मला तर काहीच समजेना. बहीणीने ओळखलं. बॕनरखाली मृतदेह आहे, असं तिनेच मला निदर्शनास आणून दिलं. आम्ही दवाखान्याच्या प्रवेशदाराजवळ परतलो. समोरच्या बाजूला साध्या कपड्यातले पोलीस दिसले. त्यापैकी एका ओळखीच्या पीएसआयने मला इकडे ये अशी खूण केली. मी बहीणीला दवाखान्यात जायला सांगितलं आणि रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. एव्हाना जमलेल्या घोळक्यांनी दंगा करायला सुरूवात केली होती. पोलीसांनी आणखीन दोघा-तिघांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी "गर्दीतले कोणी ओळखीचे आहेत का? असं आम्हाला विचारलं. शंभरापेक्षा जास्त जणांच्या गर्दीवर नीट नजर फिरवून आम्ही ओळखीचे चेहरे पोलीसांना सांगितले. "त्यांची समजूत काढायचा प्रयत्न कराल का?" त्या पोलीसाने विचारणा केली. आम्ही एकमेकांचे चेहरे पाहीले. आम्ही एकजात सगळे हिंदू ,समोर  सगळी गर्दी मुसलमानांची. तरीही, थोडा धीर करुन होकार दिला आणि गर्दीत मिसळून गेलो. चौघंही वेगवेगळ्या बाजूला जाऊन आमच्या ओळखीच्या व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
      मुस्लीम भावनिकदृष्ट्या फार गहन असतात. कधी कुठल्या कारणावरून पेटून उठतील आणि कधी थंडपणे काय करतील ते सांगता यायचं नाही. इतर धर्मियांची माथी भडकवता येतात. पण त्यांच्याकडून थंड डोक्याने काम काढून घेणं महाकर्मकठीण काम. धर्माची आण दिली तर मुस्लिम या दोन्ही गोष्टी तुलनेने फार सहज करू शकतात. या गुंतागुंतीचं उत्तर कदाचित त्यांच्या डीएनए विश्लेषणाद्वारे मानववंश शास्त्र देऊ शकेल. हा-हा म्हणता म्हणता जमाव दोन-अडीचशेपेक्षा जास्त झाला. एस.टी महामंडळाचा एकही अधिकारी जमावासमोर येऊन उत्तर देण्यास तयार नव्हता. पोलीस संख्याबळाने कमी असल्याने उगाच कारवाई चालू करुन आगीत तेल ओतायला तयार नव्हते. पण, साध्या वेशातले दोन तीन पोलीस गर्दीला आवरू पहात होते. अपघात होऊन एक तास होऊन गेला होता. मुलगी बिचारी तशीच रस्त्यावर पडून होती. मी आणि इतर तिघे "पंचनामा करून मृतदेह तरी हलवूया. तिची मरणानंतर अशी अवहेलना नको" म्हणून सतत तिच्या कुटूंबाकडे आर्जवं करत होतो.
      पण, तिच्या मृतदेहाचा ताबा आता गर्दीतल्या अघोषित नेत्यांकडे आला होता. गर्दीला चेहरा नसला की सर्वसाधारणपणे त्यातल्या त्यात उंच धिप्पाड किंवा मोठ-मोठ्या आवाजात बोलणा-या व्यक्ती या गर्दीचे पुढारी होऊन जातात. तसंच इथे चार-पाच जण तातडीने आपसूक नेते झाले होते. त्यापैकी एकाची क्रिकेटमुळे ओळख होती. तो माझ्याशी भांडत होता, जोपर्यंत महामंडळाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही. त्या मुलीच्या कुटूंबाची अवस्था फार विचित्र झाली होती. त्यांना निर्णय घेण्याचाही अधिकार राहीला नव्हता. बिचारे नुसते आक्रोश करत होते. गर्दी वाढत होती. एक ओरडला " एकभी गाडी अभी रस्तेपे नही चलेगी".
     झालं. घटनास्थळी येणारे रस्ते हळूहळू बंद होऊ लागले. ही जागा एक तिठा आहे. तीन बाजूचे रस्ते बंद झाले तर रूग्णवाहीका व पोलीस गाड्या यायला जागा उरली नसती. मग यात एका त्रयस्थाने चतुराईने सल्ला दिला की, तिथून साधारण दोनशे मीटर अंतरावर असणारा मुख्य शहरी रस्ता बंद करा....
        "चलो.." सटकलेली शंभरएक टाळकी मुख्य रस्त्याकडे निघाली. वाटेत त्यांना एक पत्रकार व्हीडीओ घेताना दिसला. त्यांनी संभाव्य धोका ओळखून त्याचा कॕमेरा हिसकावून घेतला, त्याला जबर मारहाण केली आणि बहुतेक जण मुख्य रस्त्याकडे निघून गेले. गर्दी कमी झाली. आम्ही गर्दीच्या नेत्यांशी चर्चा करत होतो. अचानक गंगाधरपंत पटवर्धन शाळेच्या मैदानावर उभे असलेल्या काही जणांनी दगडफेक चालू केली. आम्ही लगेच गाडीसमोरून बाजूला गेलो. पण, सादीक नावाच्या एकाने गाडीसमोरच उभं राहून दगडफेक करणा-यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने, मुख्य रस्त्यावरून संचलन करत येणारी अतिरीक्त पोलीस पथकं व दंगलनियंत्रण तुकडी पाहीलेली असावी. अशा वेळी तोडफोड झाली तर पोलीस कठोर होतील याची जाणिव त्याला झाली. एक दगड सादीकच्या कानाजवळून जात मागच्या खिडकीच्या काचेवर आदळला. तो चांगलाच उंच असल्याने उडालेल्या काही काचा त्याच्या मानेजवळ जखमा करून गेल्या. आम्ही शहर पोलीस जिथे होते तिथे गेलो. दंगलनियंत्रण पथक आल्यानंतर काहीच वेळात शिवसेनेचे स्थानिक प्रभावशाली पदाधिकारी व कार्यकर्तेही घटनास्थळी आले. त्यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटला.
         पण, अपघात घडून चार तासांपेक्षा जास्त अवधी झाला होता. अपघातग्रस्त मुलगी तोपर्यंत रस्त्यावर पडून होती. मी तिच्याकडे बघून सुन्न होत होतो. काहीजण मुसलमानांवर दर वेळी अन्यायच होतो, अशी हाकाटी मारत होते. त्यांच्यातलेच काही त्यांना गप्प करत होते. अपघाताचं मूळ कारण असणारी त्या तिठ्याची रचना, चालकांवर अन्यायकारक असणारं वाहतूक वेळापत्रक आणि महामंडळाच्या गाड्यांचा अवाढव्य आकार याबाबत कोणी एक शब्द उच्चारला नव्हता. फक्त 'अन्याय , अन्याय' अशी बोंब होत होती.
अपघातानंतर जमावाची प्रतिक्रीया स्वाभाविक मानली तरी मूळ कारणांपेक्षा राजकीयदृष्ट्या सोयीचं धार्मिक कारण पुढे करून गर्दीने त्या मृतदेहाची चार तास विटंबनाच केली होती. कुठल्याही गोष्टीत धर्म आडवा आणून काय साधतं? प्रत्येक प्रकरणात इस्लाम धोके में म्हणण्याइतका इस्लाम कोवळा आहे का?
       खरं तर, मुसलमानांना त्यांचे शत्रू नक्की कोण याचंच कोडं कधी सुटलेलं नाही. काफीर शत्रू, ख्रीस्ती शत्रू, शिया शत्रू, सुन्नी शत्रू, बाहेर शत्रू अन् घरातही शत्रूच..
       दहशतवादाचा धर्म नसेल तर धर्माचा दहशतवाद असतोच. तो कुठून कधी तोंड वर काढेल याचा नेम नाही. कलामांना फार जवळ न करणारे याकूब मेमनला आपला सोयरा मानतात, तेव्हा कुणाही संवेदनशील नागरीकाला दुःखच होतं. अशा वेळी कधीमधी पुस्तकं, लेखांतून भेटलेल्या हमीद दलवाईची आठवण होते. "हमीद, कुठायस तू?"

Monday, July 13, 2015

भाषा आणि विकासप्रक्रीया: उच्चार व अक्षर निर्मिती (१३.०७.२०१५)

      उत्क्रांती आणि भाषा या लेखात आपण लिपींचा उगम कसा होतो आणि विविध भाषांमध्ये विविध उच्चारांनुसार वेगवेगळी सांकेतिक चिन्हे अर्थात अक्षरे आणि असमान अक्षरसंख्या का आहेत, याची अल्पशी चर्चा केली.
       या भागात आपण भाषांचा विकास कसा होतो, याबद्दल थोडा विचार करू.
       कोणत्याही भाषेचे एकूण चार भाग असतात.
१. श्रवण/ऐकणे (आवाज/ध्वनी/तरंग कानाद्वारे स्विकारणे).
२. उच्चार/बोलणे (ऐकलेल्या ध्वनींचे गळ्यातील स्वरयंत्र, जीभ, ओठ, नाक हे अवयव वापरून पुन्हा तसेच ध्वनीतरंग निर्माण करणे).
३. वाचन (नजरेचा वापर करून अप्रकट/मनातल्या मनात किंवा प्रकट/मोठ्याने वाचणे).
४. लेखन (हातांचा वापर करून पाहीलेली/माहीत असलेली अक्षरे पुन्हा निर्माण करणे).
       उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात केवळ आवाज/तरंग निर्माण करणे इतकेच शक्य होते. आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या प्राण्यांचीही विशिष्ट बोली असते. वर्षानुवर्षे याच प्रकारचे आवाज वापरल्याने त्यांनीही ठराविक आवाज ठराविक प्रसंगी वापरण्याचे कसब आत्मसात केले आहे. वाघाच्या असण्याची चाहूल इतरांना देण्यासाठी वानर विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी वटवाघूळे आणि काही मासे विविध प्रकारचे तरंग वापरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
        मानव प्रजाती या टप्प्याहून पुढे येऊन लिपी निर्माण करू शकली. जगाच्या विविध भागात वसलेल्या मानवसमूहांनी त्यांना जमेल त्या पद्धतीने उच्चार व त्यानुसार लिपी तयार केली.
        जमेल त्या पद्दधतीने यासाठी म्हटलं की, व्यक्तींची वैयक्तिक व व्यक्तिसमूहांची नैसर्गिक जडणघडण यात थोडाफार फरक असतो. काही जणांची जीभ जड असू शकते, काही जण नाकात उच्चार करत असतील, अशा प्रकारचं वैविध्य असतं. इंग्रजी "K" या अक्षराचा उच्चार मराठी/संस्कृत/हिंदी भाषिक "के" असा करत असतील तरी मूळ इंग्रज तो 'के' आणि 'खे' च्या मधल्याच कुठल्यातरी पट्टीत "क्खेअ" असा करतात. यामुळेच अस्खलीत इंग्रजी जाणणा-या मराठी भाषक व्यक्तिला जन्मजात इंग्रजी असणा-या व्यक्तिचे उच्चार समजून घेताना अडचण येते.
         जगात कित्येक भाषा अशा आहेत की ज्यांना स्वतःची लिपी आजतागायत नाही. विशेषतः मर्यादीत क्षेत्रफळाच्या भागात बोलल्या जाणा-या बोलीभाषा जवळच्या मोठ्या भाषेची/जननीभाषेची लिपी वापरतात. अशा भाषांना नष्ट होण्याचा फार मोठा धोका असतो. संयुक्त राष्ट्र संघटना नित्यनेमाने जगातील मृतप्रायः भाषांवर अहवाल प्रसिद्ध करते.
       ब-याच भाषांची काही अक्षरे कालानुरूप बदलली जातात किंवा दुर्मिळ प्रसंगी त्यात भर घातली जाते. अलिकडचे आपणा सर्वांना माहीत असणारे बदल म्हणजे मराठीत आपण 'ए', 'ऐ' व 'ल' या अक्षरांच्या मूळ रचनेत फेरफार केला.
        अशा प्रकारे, उच्चारांवरून अक्षरे व अक्षरांवरून व्यापक प्रमाणावर मान्यता असणारे उच्चार, असा भाषेच्या प्रगतीचा एक टप्पा मानवाने गाठला.

Tuesday, June 30, 2015

भाषा:उत्क्रांती आणि भाषा {२६.०६.२०१५}

        "भाषा" असं म्हटलं की काय जाणवतंय? जरा १ मिनीट थांबून चिंतन करा...
        साहजिकच काही वेगवेगळ्या लिप्या , त्यातील अक्षरं तरळून गेल्या असतील. कदाचित काही उच्चार,हेलसुद्धा कानात घुमत असतील. जनूकांतून आलेले व भूतकाळात साठलेले  असे "भाषा" या शब्दाशी जोडले गेलेले काही अनुभव मेंदू तुमच्या स्मृतीपटलावर सादर करेल.
पण, भाषा म्हणजे फक्त लिपी किंवा उच्चार एवढंच मर्यादीत प्रकरण नाही.
       व्यापक अर्थाने 'भाषा' हे कोणत्याही प्रकारचं दोन वा अधिक गोष्टींमधिल संवादाचं अथवा सूचनांच्या देवाणघेवाणीचं माध्यम/साधन असं म्हटलं जाऊ शकतं. आपल्या शरीरातील असंख्य प्रक्रीया विविध रसायनं आणि विद्यूतकणांच्या माध्यमातून केल्या जातात. याचा अर्थ आपले डोळे व आपला मेंदू यांची विद्युतधारा ही भाषा आहे. अनुवांशिकतेच्या बाबतीत डीएनएची एक स्वतंत्र भाषा आहे, ज्यात लक्षावधी वर्षांपासून प्रगत होत आलेली आज्ञावली लिहीलेली असते.
      उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात विद्यूतप्रभार आणि विविध तरंगलांबीच्या रेडीओ लहरी या संवादाचं माध्यम राहील्या असाव्यात. आजही बहुतांश पक्षी व किटक तरंगांच्या माध्यमातून संवाद साधतात. काळाच्या ओघात या संवादासाठी आवश्यक असणारे अवयव आणि संवेदना (Senses) माणसाने गमावले असावेत. पण, तंत्रविज्ञानाच्या सहाय्याने आपण त्या पुन्हा मिळवू शकतो किंवा नविन संवेदनांसाठी मेंदूला तयार करू शकतो.
       त्यानंतरच्या टप्प्यात शारीरिक खाणाखूणा आणि आवाजी इशारे पृथ्वीवासियांनी तयार केले असावे. आजही जमिनीवर वावरणा-या जनावरांच्या जीवनशैलीचा हलकासा अभ्यास केला, तरीही हे प्रकरण समजून येईल. इतकंच कशाला आपली 'देहबोली' (Body language ) हे कशाचं निदर्शक आहे?
       उत्क्रांतीच्या सर्वात आधुनिक टप्प्यात मानवाने प्रथम चित्रलिपी व सांकेतिक चित्रे तयार केली असावी. चीनी भाषेत आजही वस्तू-निदर्शक सांकेतिक चित्रलिपीचा वापर होतो. यात पुढील टप्प्यावर वस्तूंऐवजी उच्चारांना सांकेतिक चित्र देण्याचा प्रयोग झाला व लिपी या प्रकाराचा जन्म झाला. जगभरात थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या लिप्यांचा विकास झाला. त्यातील काही विद्वानांनी लिपींमध्ये भर घालणे थांबवून शक्य ते सर्व उच्चार उपलब्ध सांकेतिक चित्रं (अक्षरं) एकमेकांच्या सोबतीने गुंफून वाक्यरचना तयार करण्याचा प्रघात पाडला. यामुळेच विविध लिपींमध्ये वेगवेगळ्या अक्षर रचना व अक्षरांच्या असमान संख्या पहायला मिळतात.

Monday, June 29, 2015

आहार, निद्रा, मैथून विरूद्ध समलैंगीकता


        लेखाच्या शिर्षकात नमूद केलेल्या आहार, निद्रा, मैथून या सजीवांच्या मुलभूत प्रवृत्तींच्या सोबतीने 'भय' या प्रवृत्तीचाही ब-याचदा समावेश केला जातो, पण समलैंगीकता ही सहज प्रवृत्ती नाही अशीच सामान्य धारणा आहे. सध्या महाजालावर जोरात चर्चेत असलेल्या अमेरीकन निर्णयामुळे जितके जण खूष झालेत त्यापेक्षाही कित्येक पट लोक भयचकीत झाले आहेत.
        निर्णय विवाहाबाबत असला तरी विवाह म्हणजे समाजमान्य शरीरसंबंध हे गणित सर्वांनाच मान्य आहे. यातील स्वतःला काहीतरी भारी समजणा-या काही मोजक्या शाकाहारी लोकांनी मांसाहारी लोकांशी विनाकारण उकरलेला शाकाहारी-मांसाहारी हा भेद आणि तरूण वयापर्यंत आपल्या घरच्यांना आपल्या निद्रेबाबत असलेल्या तक्रारी वगळता आहार व निद्रा याबाबतीत फारसा गोंधळ जगभरात कुठे उडालेला नाही. परंतु, मैथून ही बाब मुळातच आकर्षणाचा विषय आणि त्यातही ती सामाजिक प्रतिष्ठा,इज्जत अशा भावनांशी जोडली गेल्यामुळे तिला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
        एखाद्या व्यक्तीच्या या पैलूबाबत समाजात अमूकतमूकचं अमूकतमूकशी लफडं वैगरे प्रकारे जितकी चर्चा होईल तितकी ती आहार व निद्रेबाबत निश्चितच होणार नाही. अशा परीस्थितीत मैथून ही बाब वैयक्तिक असली तरीही समाज (इथं "समाज" म्हणजे ज्या व्यक्तींचं वैयक्तिक आयुष्य गृहीत धरलं आहे, ते सोडून इतर सर्व) या बाबतीत कधीही (अतिरेकी प्रमाणात) जागरूक असतो. यात कोणतेही अपवाद नाहीत. म्हणून निवडणूकांच्या वेळी एखाद्या नेत्याच्या खाजगी आयुष्यातील प्रकरणे बाहेर काढणे, त्याच्या चारीत्र्यावर संशय व्यक्त करणे अशा गोष्टी सर्वसामान्यपणे घडत असतात. असा समाज दुस-यांच्या साधारणतः विचित्र वाटणा-या लैंगिक प्रवृत्तींना खाजगी बाब म्हणून दुर्लक्षित करेल, अशी शक्यताच नाही.
        समलैंगीकतेविषयी समलिंगी वगळता इतरांमध्ये किळस ते भय अशा विविध भावना आहेत. त्यात समलैंगीकता ही प्रवृत्ती नैसर्गिक की विकृती हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. दोन्ही बाजूला आपापली समर्थनं आहेत.
          माझं मत असं आहे की, पुनरूत्पादन हा निसर्गाचा नियम आहे. त्या नियमाला धरूनच विवाहसंस्था मानवी समाजात रूजली. याच्या मागे मानवी वंशसातत्य राहावे हा विचार आहे. मानव इतर पशूंहून वेगळ्या नैसर्गिक पातळीवर असण्याचं कारण आहे तो त्याचा "मेंदू". मानव खूप वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, विचारशक्तीने नविन यंत्रणा व व्यवस्था उभ्या करू शकतो. पण, मेंदूचा काही सृजनात्मक कामांमध्ये वापर करण्याऐवजी तो मैथूनासारख्या मूळ सजीव प्रवृत्तीमधेच इतका अडकून पडलेला दिसतो तेव्हा वाटतं, उत्क्रांतीमध्ये मानवी मेंदूचा विकास होण्यापेक्षा त्याच्या लैंगिक अवयवांचाच विकास व्हायला पाहीजे होता. समलैंगीकतेला "नैसर्गिक" ठरवण्यासाठी इतर सजीवांमधील लैंगिक व्यवहारांचे दाखले दिले जात आहेत. ते ही फारच मर्यादीत आहेत. पण, इतर सजीवांच्या पातळीवरून आपण जाणिवपूर्वक स्वतःला वेगळे करू शकतो. फक्त तशी मानसिकता हवी. अन्यथा, आहार- निद्रा-मैथून बस्स...! आयुष्य परीपूर्ण.
        विवाहसंस्थेचीही अनेक रूपं आहेत व ती परीपूर्ण नाहीत. म्हणूनच "लिव्ह इन रीलेशनशीप" सारखे पर्याय पुढे आले व रूळत आहेत. त्यातही अनेक त्रूटी आहेत. जिथे मानवी भावनांचा विषय असतो, तो विषय प्रचंड गुंतागुंतीचाच असतो. त्याला एकच एक सर्वोत्तम उपाय मिळणं शक्यच नाही. अशा वेळी व्यक्ती व समाजाने भावनांवर ताबा ठेवत विचारक्षमता वापरणे हा श्रेयस्कर मार्ग असतो.
         इतर सजीवांमध्ये समलैंगीकतेची भावना आढळून येत असेल तरी ते "फॕड" किंवा "कूल फॕशन" म्हणून पसरण्याची शक्यता नक्कीच नाही. माणसांमध्ये त्याची शक्यता अधिक असल्याने समलिंगी नसणारे भितीने घेरलेले आहेत. बहुतांश समाज ज्याला विकृती मानतो अशा प्रवृतीला आधी प्रकृती आणि नंतर संस्कृती म्हणून रुजवण्याचे प्रयत्न होणार, याची खात्रीच आहे. अमेरीकन कोर्टाने समलिंगी विवाहांना मंजूरी जाहीर केल्यानंतर जो उन्माद दिसला, त्यावरून "आम्ही समलिंगी नसण्याचा आमचा अधिकार तुम्हाला मान्य आहे का?" असं विचारण्याची वेळ लवकरच येईल असं वाटत आहे. यामुळे समलिंगी स्त्री-पुरूषांनी त्यांचं "तसं" असणं स्पष्ट दिसेल याबाबत ठोस काहीतरी खूण जवळ बाळगावी. नाहीतर, चूकीच्या कोणावर तरी "ट्राय" मारली तर राडे होणार याची १००% ग्वाही देतो.

©ओमकार गिरकर