Search This Blog

Friday, July 31, 2015

हमीद, कुठे आहेस?

          या वर्षाच्या (सन २०१५) सुरूवातीलाच एक अत्यंत दुर्देवी घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाच्या मधे असलेल्या रस्त्यावर एका शाळकरी मुलीचा चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना बसच्या मागच्या चाकाखाली चिरडून अपघाती मृत्यू झाला. शाळा सुटण्याची वेळ होती. शेकडो मुलं या परीसरात होती. या मुलांना काही नीट समजायच्या आतच त्यांनी घाबरून गोंधळ घालायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच घटनेला सुरूवात झाली. 
         मुलीसोबत असणा-या तिच्या मैत्रीणींकडून ही बातमी आधी तिच्या घरी आणि मग सर्व शहर व ग्रामीण भागात पसरली. काहीच वेळात तिथे लोकांचा घोळका जमू लागला. कोणीतरी शिताफीने बाजूला लटकणारा बॕनर काढून मृत मुलीच्या अंगावर टाकला जेणेकरून ते भयानक दृश्य पाहून घोळके बिथरू नयेत. तोपर्यंत ही बातमी शहर पोलीस स्थानकात पोहोचली होती. आधीच अपूरा असणारा पोलीस कर्मचारी वर्ग घटनास्थळी पोहोचला. पण जमलेला घोळका पाहून त्यांनी सूज्ञपणे थोडं दूर राहून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरूवात केली. गर्दी जमा होतेय हे पाहून मार खाण्याच्या भितीने बसचे चालक-वाहक तिथून  निसटले.
          त्यावेळी माझ्या बाबांना मोतीबिंदूवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेलं होतं. डोळ्यांचा नविन विभाग जिथे आहे, तिथे मागच्या बाजूलाच हा गोंधळ चालू होता. सारे उपचारार्थी व सोबतचे लोक खिडकीजवळ जाऊन पाहू लागले होते. बाहेरील संरक्षण भिंतीमुळे आतून काहीच दिसेना. जसाजसा गोंधळ वाढत चालला तसे मी आणि माझी धाकटी बहीण घटनास्थळी गेलो. खूप गर्दी होती. शाळकरी मुलं घाबरून सैरावैरा धावत होती. काही जण कुतूहलापोटी पुढे जात. परत घाबरून मागे धावत येत. मी आणि बहीण थोडं पुढे गेलो. मला तर काहीच समजेना. बहीणीने ओळखलं. बॕनरखाली मृतदेह आहे, असं तिनेच मला निदर्शनास आणून दिलं. आम्ही दवाखान्याच्या प्रवेशदाराजवळ परतलो. समोरच्या बाजूला साध्या कपड्यातले पोलीस दिसले. त्यापैकी एका ओळखीच्या पीएसआयने मला इकडे ये अशी खूण केली. मी बहीणीला दवाखान्यात जायला सांगितलं आणि रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. एव्हाना जमलेल्या घोळक्यांनी दंगा करायला सुरूवात केली होती. पोलीसांनी आणखीन दोघा-तिघांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी "गर्दीतले कोणी ओळखीचे आहेत का? असं आम्हाला विचारलं. शंभरापेक्षा जास्त जणांच्या गर्दीवर नीट नजर फिरवून आम्ही ओळखीचे चेहरे पोलीसांना सांगितले. "त्यांची समजूत काढायचा प्रयत्न कराल का?" त्या पोलीसाने विचारणा केली. आम्ही एकमेकांचे चेहरे पाहीले. आम्ही एकजात सगळे हिंदू ,समोर  सगळी गर्दी मुसलमानांची. तरीही, थोडा धीर करुन होकार दिला आणि गर्दीत मिसळून गेलो. चौघंही वेगवेगळ्या बाजूला जाऊन आमच्या ओळखीच्या व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
      मुस्लीम भावनिकदृष्ट्या फार गहन असतात. कधी कुठल्या कारणावरून पेटून उठतील आणि कधी थंडपणे काय करतील ते सांगता यायचं नाही. इतर धर्मियांची माथी भडकवता येतात. पण त्यांच्याकडून थंड डोक्याने काम काढून घेणं महाकर्मकठीण काम. धर्माची आण दिली तर मुस्लिम या दोन्ही गोष्टी तुलनेने फार सहज करू शकतात. या गुंतागुंतीचं उत्तर कदाचित त्यांच्या डीएनए विश्लेषणाद्वारे मानववंश शास्त्र देऊ शकेल. हा-हा म्हणता म्हणता जमाव दोन-अडीचशेपेक्षा जास्त झाला. एस.टी महामंडळाचा एकही अधिकारी जमावासमोर येऊन उत्तर देण्यास तयार नव्हता. पोलीस संख्याबळाने कमी असल्याने उगाच कारवाई चालू करुन आगीत तेल ओतायला तयार नव्हते. पण, साध्या वेशातले दोन तीन पोलीस गर्दीला आवरू पहात होते. अपघात होऊन एक तास होऊन गेला होता. मुलगी बिचारी तशीच रस्त्यावर पडून होती. मी आणि इतर तिघे "पंचनामा करून मृतदेह तरी हलवूया. तिची मरणानंतर अशी अवहेलना नको" म्हणून सतत तिच्या कुटूंबाकडे आर्जवं करत होतो.
      पण, तिच्या मृतदेहाचा ताबा आता गर्दीतल्या अघोषित नेत्यांकडे आला होता. गर्दीला चेहरा नसला की सर्वसाधारणपणे त्यातल्या त्यात उंच धिप्पाड किंवा मोठ-मोठ्या आवाजात बोलणा-या व्यक्ती या गर्दीचे पुढारी होऊन जातात. तसंच इथे चार-पाच जण तातडीने आपसूक नेते झाले होते. त्यापैकी एकाची क्रिकेटमुळे ओळख होती. तो माझ्याशी भांडत होता, जोपर्यंत महामंडळाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही. त्या मुलीच्या कुटूंबाची अवस्था फार विचित्र झाली होती. त्यांना निर्णय घेण्याचाही अधिकार राहीला नव्हता. बिचारे नुसते आक्रोश करत होते. गर्दी वाढत होती. एक ओरडला " एकभी गाडी अभी रस्तेपे नही चलेगी".
     झालं. घटनास्थळी येणारे रस्ते हळूहळू बंद होऊ लागले. ही जागा एक तिठा आहे. तीन बाजूचे रस्ते बंद झाले तर रूग्णवाहीका व पोलीस गाड्या यायला जागा उरली नसती. मग यात एका त्रयस्थाने चतुराईने सल्ला दिला की, तिथून साधारण दोनशे मीटर अंतरावर असणारा मुख्य शहरी रस्ता बंद करा....
        "चलो.." सटकलेली शंभरएक टाळकी मुख्य रस्त्याकडे निघाली. वाटेत त्यांना एक पत्रकार व्हीडीओ घेताना दिसला. त्यांनी संभाव्य धोका ओळखून त्याचा कॕमेरा हिसकावून घेतला, त्याला जबर मारहाण केली आणि बहुतेक जण मुख्य रस्त्याकडे निघून गेले. गर्दी कमी झाली. आम्ही गर्दीच्या नेत्यांशी चर्चा करत होतो. अचानक गंगाधरपंत पटवर्धन शाळेच्या मैदानावर उभे असलेल्या काही जणांनी दगडफेक चालू केली. आम्ही लगेच गाडीसमोरून बाजूला गेलो. पण, सादीक नावाच्या एकाने गाडीसमोरच उभं राहून दगडफेक करणा-यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने, मुख्य रस्त्यावरून संचलन करत येणारी अतिरीक्त पोलीस पथकं व दंगलनियंत्रण तुकडी पाहीलेली असावी. अशा वेळी तोडफोड झाली तर पोलीस कठोर होतील याची जाणिव त्याला झाली. एक दगड सादीकच्या कानाजवळून जात मागच्या खिडकीच्या काचेवर आदळला. तो चांगलाच उंच असल्याने उडालेल्या काही काचा त्याच्या मानेजवळ जखमा करून गेल्या. आम्ही शहर पोलीस जिथे होते तिथे गेलो. दंगलनियंत्रण पथक आल्यानंतर काहीच वेळात शिवसेनेचे स्थानिक प्रभावशाली पदाधिकारी व कार्यकर्तेही घटनास्थळी आले. त्यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटला.
         पण, अपघात घडून चार तासांपेक्षा जास्त अवधी झाला होता. अपघातग्रस्त मुलगी तोपर्यंत रस्त्यावर पडून होती. मी तिच्याकडे बघून सुन्न होत होतो. काहीजण मुसलमानांवर दर वेळी अन्यायच होतो, अशी हाकाटी मारत होते. त्यांच्यातलेच काही त्यांना गप्प करत होते. अपघाताचं मूळ कारण असणारी त्या तिठ्याची रचना, चालकांवर अन्यायकारक असणारं वाहतूक वेळापत्रक आणि महामंडळाच्या गाड्यांचा अवाढव्य आकार याबाबत कोणी एक शब्द उच्चारला नव्हता. फक्त 'अन्याय , अन्याय' अशी बोंब होत होती.
अपघातानंतर जमावाची प्रतिक्रीया स्वाभाविक मानली तरी मूळ कारणांपेक्षा राजकीयदृष्ट्या सोयीचं धार्मिक कारण पुढे करून गर्दीने त्या मृतदेहाची चार तास विटंबनाच केली होती. कुठल्याही गोष्टीत धर्म आडवा आणून काय साधतं? प्रत्येक प्रकरणात इस्लाम धोके में म्हणण्याइतका इस्लाम कोवळा आहे का?
       खरं तर, मुसलमानांना त्यांचे शत्रू नक्की कोण याचंच कोडं कधी सुटलेलं नाही. काफीर शत्रू, ख्रीस्ती शत्रू, शिया शत्रू, सुन्नी शत्रू, बाहेर शत्रू अन् घरातही शत्रूच..
       दहशतवादाचा धर्म नसेल तर धर्माचा दहशतवाद असतोच. तो कुठून कधी तोंड वर काढेल याचा नेम नाही. कलामांना फार जवळ न करणारे याकूब मेमनला आपला सोयरा मानतात, तेव्हा कुणाही संवेदनशील नागरीकाला दुःखच होतं. अशा वेळी कधीमधी पुस्तकं, लेखांतून भेटलेल्या हमीद दलवाईची आठवण होते. "हमीद, कुठायस तू?"

No comments:

Post a Comment