Search This Blog

Monday, July 13, 2015

भाषा आणि विकासप्रक्रीया: उच्चार व अक्षर निर्मिती (१३.०७.२०१५)

      उत्क्रांती आणि भाषा या लेखात आपण लिपींचा उगम कसा होतो आणि विविध भाषांमध्ये विविध उच्चारांनुसार वेगवेगळी सांकेतिक चिन्हे अर्थात अक्षरे आणि असमान अक्षरसंख्या का आहेत, याची अल्पशी चर्चा केली.
       या भागात आपण भाषांचा विकास कसा होतो, याबद्दल थोडा विचार करू.
       कोणत्याही भाषेचे एकूण चार भाग असतात.
१. श्रवण/ऐकणे (आवाज/ध्वनी/तरंग कानाद्वारे स्विकारणे).
२. उच्चार/बोलणे (ऐकलेल्या ध्वनींचे गळ्यातील स्वरयंत्र, जीभ, ओठ, नाक हे अवयव वापरून पुन्हा तसेच ध्वनीतरंग निर्माण करणे).
३. वाचन (नजरेचा वापर करून अप्रकट/मनातल्या मनात किंवा प्रकट/मोठ्याने वाचणे).
४. लेखन (हातांचा वापर करून पाहीलेली/माहीत असलेली अक्षरे पुन्हा निर्माण करणे).
       उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात केवळ आवाज/तरंग निर्माण करणे इतकेच शक्य होते. आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या प्राण्यांचीही विशिष्ट बोली असते. वर्षानुवर्षे याच प्रकारचे आवाज वापरल्याने त्यांनीही ठराविक आवाज ठराविक प्रसंगी वापरण्याचे कसब आत्मसात केले आहे. वाघाच्या असण्याची चाहूल इतरांना देण्यासाठी वानर विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी वटवाघूळे आणि काही मासे विविध प्रकारचे तरंग वापरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
        मानव प्रजाती या टप्प्याहून पुढे येऊन लिपी निर्माण करू शकली. जगाच्या विविध भागात वसलेल्या मानवसमूहांनी त्यांना जमेल त्या पद्धतीने उच्चार व त्यानुसार लिपी तयार केली.
        जमेल त्या पद्दधतीने यासाठी म्हटलं की, व्यक्तींची वैयक्तिक व व्यक्तिसमूहांची नैसर्गिक जडणघडण यात थोडाफार फरक असतो. काही जणांची जीभ जड असू शकते, काही जण नाकात उच्चार करत असतील, अशा प्रकारचं वैविध्य असतं. इंग्रजी "K" या अक्षराचा उच्चार मराठी/संस्कृत/हिंदी भाषिक "के" असा करत असतील तरी मूळ इंग्रज तो 'के' आणि 'खे' च्या मधल्याच कुठल्यातरी पट्टीत "क्खेअ" असा करतात. यामुळेच अस्खलीत इंग्रजी जाणणा-या मराठी भाषक व्यक्तिला जन्मजात इंग्रजी असणा-या व्यक्तिचे उच्चार समजून घेताना अडचण येते.
         जगात कित्येक भाषा अशा आहेत की ज्यांना स्वतःची लिपी आजतागायत नाही. विशेषतः मर्यादीत क्षेत्रफळाच्या भागात बोलल्या जाणा-या बोलीभाषा जवळच्या मोठ्या भाषेची/जननीभाषेची लिपी वापरतात. अशा भाषांना नष्ट होण्याचा फार मोठा धोका असतो. संयुक्त राष्ट्र संघटना नित्यनेमाने जगातील मृतप्रायः भाषांवर अहवाल प्रसिद्ध करते.
       ब-याच भाषांची काही अक्षरे कालानुरूप बदलली जातात किंवा दुर्मिळ प्रसंगी त्यात भर घातली जाते. अलिकडचे आपणा सर्वांना माहीत असणारे बदल म्हणजे मराठीत आपण 'ए', 'ऐ' व 'ल' या अक्षरांच्या मूळ रचनेत फेरफार केला.
        अशा प्रकारे, उच्चारांवरून अक्षरे व अक्षरांवरून व्यापक प्रमाणावर मान्यता असणारे उच्चार, असा भाषेच्या प्रगतीचा एक टप्पा मानवाने गाठला.

2 comments: