Search This Blog

Thursday, September 17, 2015

श्रद्धेचा गुंता

गदी दोन वर्ष आधीपण बरं होतं..
मी बिनधास्तपणे तुझा गजर करत होतो..
आता दुनियादारी बघितली, निरीश्वरवादीं लिखाण वाचलं, धर्मांची आणि तुझीही उत्पत्ती वाचली..
बुद्धी सारासार विचार करू लागली..

इथे ध्यान- चिंतन करण्याला अध्यात्माशी जोडलं गेलंय,
आणि अध्यात्माचं तंगडं धर्माच्या तंगड्यात अडकवलं गेलंय..
विरोध कशाला, कुठे आणि किती करायचा..
काय आणि किती स्विकारायचं याचा गुंता संपत नाही.

व्यवहारात निरूपयोगी असलेल्या बालपणीच्या खेळण्याशी आनंद आठवणी जोडलेल्या असाव्या..
ते खेळणं टाकून देता येत नाही म्हणून जपून ठेवावं, तसं आता तुझं माझं झालंय..

तुझा हात अचानक सोडायचा तर जी पोकळी तयार होईल ती कशाने भरायची?
विज्ञान आणि तर्काने जगाची खरी ओळख पटतेय..
पण अज्ञानातलं भावनिक सुख त्यात नाही.

श्रद्धा ठेवली तर प्रचिती येते म्हणतात..
पण, मी स्वतःशीही भांडणारा माणूस, कसलंच प्रमाण न मानणारा..
जगात इतका गदारोळ, विरोधाभास आणि विषमता असताना कोणावर श्रद्धा तरी कशी ठेवावी?

तू खरंच असशील तर ..
एवढा गोंधळ समजून घे..

©ओमकार गिरकर

Wednesday, September 9, 2015

विश्रांती

        "मला पुन्हा एक ब्रेक हवा आहे." अरीजीत बीयरची बाटली तोंडाला लावताना राहूलला म्हणाला. "अरे, पण तू जीवाचं मलेशिया करून आलास त्याला पुरते तीन महीनेही नाही झालेत." राहूलने त्याला वाटलेलं आश्चर्य अजिबात न लपवता अरीजीतला प्रतिसाद दिला. अरीजीत काहीही न बोलता शांत एकटक बाटलीच्या निमुळत्या तोंडाकडे पहात राहीला. अलगद एक घुटका घेत म्हणाला, " मलाच कळत नाहीय मला काय हवंय ते.." तर यावर राहूलचं इरसाल उत्तर, "लग्न कर. इशा तयारच आहे. तुच चालढकल करतो आहे."
      "चालढकलीचा प्रश्न नाही रे. लग्न म्हणजे केवढा खर्च होतो. आता मी उगाच मलेशिया ट्रीप केली असं वाटतंय. पैशांचा फालतू चुराडा झाला."
       यावर राहूल अगदी मिश्कील हसत म्हणाला ," विपश्यनेला जा. तू भरकटला आहेस. " अरीजीतने अगदी गंभीरपणे प्रश्न केला. " खरंच म्हणतोयस? मी भरकटलोय? काय कमी आहे ते समजतंच नाही." यावर राहूल त्रासला," चील यार, अऱ्या. बीयर पी. कोमट झाली तर घोड्याच्या मूतासारखी लागेल. "
अरिजीतने गुगली टाकली. " तू कधी घोड्याचं मूत चाखलंस?"... हाहाहाहा... दोघंही हसू लागले.
        दुसऱ्या दिवशी शनिवार होता. अरीजीत तरीही नेहमीसारखं साडे सहाला उठला. ब्रश करताना आरश्यासमोर उभा राहीला. तर त्याच्या दाट केसातला डोकावणारा एक पांढरा केस त्याला त्रास देवू लागला. म्हणून तो शांत आरामखूर्चीत बसून पेपर वाचत ब्रश करू लागला. सगळं आवरल्यावर अॉफीसला जायच्या वेळेवर ट्रॕक पॕन्ट टीशर्ट घालून तयार झाला. गाडीची चावी घेतली आणि हॉलमधूनच आत किचनमधे काम करणाऱ्या आईला हाक मारली. "आई, मी मित्राकडे जातोय. रात्री उशीर होईल." आई काय बोलतेय ते ऐकण्याआधीच हा दरवाजा बंद करून निघून गेला.
      नवी मुंबईतील एका पॉश वसाहतीत अरीजीत राहात होता. पार्कींगमधे येऊन गाडीत काही क्षण तसाच बसून राहीला. आईशी मित्राकडे जातोय असं सांगून निघालेल्या अरीजीतलाही माहीत नव्हतं तो कुठे जातोय ते. गाडी कॉलनीतून बाहेर निघाली. अरीजीत अनिश्चित दिशांना कुठेही जात पनवेलपर्यंत आला. तिथे एका चौकात अगदी समोरचा रस्ता कोकणाकडे जाणारा होता. डाव्या बाजूला वळला असता तर तो पुन्हा घराकडे गेला असता. काय करायचं ते त्यालाही कळेना. मग त्याने खिश्यातून एक रूपयाचं नाणं काढलं. ते टॉस केलं. नाण्यावर काटा पडला तर तो कोकणाकडे जाणार होता. काटाच पडला. पण, त्याची बुद्धी सांगत होती. 'कुठे कोकणात जातो. रस्ते नीट नाहीयत. पावसाळा अजून थोडासा बाकी आहे. चल घरी.' मग याने पुन्हा टॉस केला. पुन्हा काटा. असं सात आठ वेळा केलं तरी काटा आणि कहर म्हणजे नाण्यावरचं एक रूपयाचं टोक कोकणच्या दिशेला. ही काय भूताटकी आहे यार. . ठीकाय .. चलो कोकण. असं स्वतःशीच बडबडत तो पुन्हा गाडीत बसला.
         इंदापूरच्या जवळपास आल्यावर पुण्याकडे जायला एक फाटा फूटतो. याने त्या रस्त्याकडे गाडी वळवली. एका टेकाडाच्या माथ्याजवळ गाडी थांबवून आसपासचं असीम निसर्गसौंदर्य तो न्याहाळू लागला. पावसाळ्याची अखेर होती, झरे अजूनही भरभरून वाहात होते. खाली उतारावर काही शेतकरी शेतात काम करताना दिसले. बाजूला काही मुलं चिखलभरल्या शेतात कबड्डी खेळत होती. याने छत्री वैगरे काही न घेता पाकीट मोबाईल सर्व गाडीत टाकली. गाडी व्यवस्थित पार्क करुन त्या शेताजवळ आला. ते शेतकरी भराभर आपापलं काम करत होते. मुलं फार खिदळत खेळत होती. ती मुलं फार लहान नव्हती. याच्यापेक्षा दोन चार वर्षांनी लहान असावी. याने निरखून पाहीलं. अंगभर चिखल ल्यालेली ती मुलं अजूनच खोलखोल चिखलात जाऊ पहात होती . याला आधी फार विचित्र वाटलं ते सगळं. पण, त्या मुलांची मस्ती पाहून आपण पण कबड्डी खेळूया अशी इच्छा याला झाली. त्याने पुढे होऊन 'मी पण येऊ का' अशी विचारणा केली. ती मुलं खेळ थांबवून या आगंतुकाकडे कुतूहलाने बघू लागली. "हा .. या ना" हा झकपक कपडे घातलेला माणूस चिखलात का येतोय हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण , अरीजीतने अगदी उत्साहात लाल पिठल्यासारख्या चिखलात उडी मारली. पार तोंडावर पडला तो. पण कोणास ठाऊक कसं त्याला बरं वाटलं. गार गार वितळलेल्या चॉकलेटसारखा चिखल.
         बराच वेळ खेळून तो त्या मुलांसोबत एका ओढ्यावर गेला. तिथं पाण्याच्या धारेखाली शांत मांडी घालून बसला. पाणी थडाथड डोक्यावर आपटत होतं. शॉवरचा नाजूकपणा नाही. निसर्गाचा रानवटपणा.. पण, सगळे विचार वाहून जात होते त्या प्रवाहासोबत. मनभरून आंघोळ झाल्यावर हा पुन्हा गाडीपाशी आला.
         सकाळी जीमला जायचे म्हणून घेतलेले कपडे गाडीतच होते. ते बदलून सोबत घेतलेली फळं खाल्ली. भूक सणसणीत लागली होती. तिथून निघून तो एका डोंगरकड्यावर आला. दूरवर समुद्र दिसत होता. शांत , स्वच्छ समुद्रकिनारा लांबवर पसरला होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. बाजूच्या एका मोठ्या अळवासारख्या वनस्पतीच्या पानावर टपोरा थेंब होता. त्यात त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहीलं. हळूच तो थेंब सरकून गेला. एक नवा थेंब जमू लागला. त्यातही तोच स्वतःला पाहु शकत होता. थेंब जमायचा मोठा व्हायचा विरघळून जायचा. आपल्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा अशाच जमतात. निथळून पडतात. एक निवांतपणाची भावना आसमंतात होती. अरीजीतला समजून चुकलं. तो स्वतःलाच शोधत होता!

Tuesday, September 1, 2015

भूमिका

.
      पूर्वी शाळकरी वयात 'श्रीमान योगी' वाचलं होतं. एखाद्या गोष्टीसारखी ती ऐतिहासिक कादंबरी तेव्हाही फारशी रूचली नव्हती. त्या व्यतिरिक्त कुठलही शिवचरित्र वाचनात आलं नव्हतं. 'छावा', 'पानिपत', 'संभाजी' यांचं वाचन सुद्धा शाळेतच कधीतरी केलेलं. त्यातल्या त्यात पानिपत आवडलेलं. पण ती कथारूप मांडणी फार आवडायचीच नाही. त्यात भावनांना नेहमी जास्त वजन असायचं, जरा तटस्थपणे केलेली मांडणी कुठे नाहीच. मग नंतरच्या काळात सुहास शिरवळकरांचे 'मंदार, फिरोज, दारा बुलंद' , इयान फ्लेमिंगचा 'जेम्स बॉन्ड' जवळचे वाटू लागले तशा ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्यापासून मी दूर झालो. मग अलिकडे राजकारणाची आवड वाटू लागली आणि पुन्हा छत्रपती शिवाजी या व्यक्तिविषयी कुतूहल जागं झालं.
      साधारण चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. दादर स्थानकाबाहेर पश्चिमेला असलेल्या 'आयडीयल' या पुस्तक दुकानात गेलो होतो. तिथे पुस्तकं विकत घेण्याआधी चाळून पाहता येतात. छत्रपती म्हटल्यानंतर साधारणतः बाबासाहेब पुरंदरे लिखीत 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाची शिफारस केली जाते. त्यानुसार मी राजा शिवछत्रपती चाळू लागलो. त्यात भराभर पाने पलटतानाही जवळपास प्रत्येक पात्राच्या जातीचा उल्लेख केलेला आहे, असं लक्षात येऊ लागलं. शिवाय ती मांडणीही एखादं प्रवचन किंवा किर्तन गद्य स्वरूपात असावं तशी वाटली. प्रत्येक पात्राची जात जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं नव्हतंच. म्हणून ते पुस्तक सरळ बाजूला ठेवून मी इतर काही मिळतंय का ते शोधू लागलो.
        त्याच ठिकाणी श्रीनिवास दा. सामंत यांनी लिहीलेलं छत्रपती महाराजांचा युद्धनिती व इतर बाजूंनी वेध घेणारं 'वेध महामानवाचा ' हे पुस्तक गवसलं. लेखक एका नावाजलेल्या संस्थेत रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांनी संशोधकाच्या दृष्टीनेच शिवराय मांडले आहेत. बस. ते पुस्तक मी आजही आवडीने उलटसुलट मधूनच कुठूनही वाचतो. उंबरखिंडीच्या लढाईचं विश्लेषण तर अप्रतिमच.
        बाकी पुरस्कार कशाच्या आधारावर मिळतात हे मला आजही ठाऊक नाही. कुठल्याही वादात दोनपैकी एक बाजू घेतली नाही तर मी तटस्थ आहे असा याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ या वादाला अजून एक बाजू आहे!
        बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात वाद घालणाऱ्या दोन्ही बाजू माझ्या बाजूने अगदीच केविलवाण्या दिसत आहेत