सैराटची कथा तसं बघायला गेलं तर अजिबात नवीन नाहीय. हे रसायन हिंदीवाल्यांनी तर पार घोळून घोळून कोळून प्रेक्षकांची कथा- कथानकाची चव नाहीशी होईस्तोवर बघणाऱ्यांना पाजलंय. अजय अतुलने दिलेल्या संगीतातही अधेमधे जून्या धून डोकावून जातात. कलाकार अगदी कोरे करकरीत नवीन आहेत असंही पहील्यांदा घडलेलं नाही. कथितरीत्या जातीयवाद दाखवणारा हा पहीलाच चित्रपट आहे असंही नाही. गावातल्या धेंडांचा माजोरडेपणा हजारो वेळा लोकांनी पाहीला असेल. प्रेमवीरांचा वास्तवाशी सामना झाल्यावर त्यांच्या प्रेमाला लागणारी ओहोटीदेखील कित्येकदा पाहीली. खून, मारामारी देखील.. मग आहे काय या चित्रपटात याड लागन्यासारखं?
इंग्लीशमधे Devil is in detail अशी म्हण आहे. याउलट सैराटचं सौंदर्य तपशीलात लपलंय. दोरीवर तोल सांभाळत या टोकाहून त्या टोकाशी जाणाऱ्या डोंबाऱ्याच्या मुलीच्या नजाकतीनं नागराजने व्यावसायिक आणि समांतर चित्रपट शैलीत समतोल साधलाय. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात, हे एरवी दवणीय अंडं वाटणारं वाक्य नागराजने खरं केलंय.
एकंदर सैराटच्या मांडणीविषयी किती तपशीलवार बोलू शकतो आपण? प्रत्येक फ्रेमवर आपल्याला बोलता येईल.
परश्यानं "याड लागलं" गाण्यात विहीरीत मारलेली उडी पहा. त्याचं विहीरीच्या काठावर पडलेलं पुढचं पाऊल दोन इंच मागे पुढे झालं असतं तर? पचकाच ना राव.. बघायला फार सोपं वाटतंय. प्रत्यक्ष चित्रीकरणात किती वेळा करायला लागलं असेल याची उत्सुकता आहे.
सैराट सारखं विविधांगी चित्रीकरण मी मराठीत या आधी कधीही पाहीलेलं नाही. घाटमाथा सदासर्वकाळ उजाड असतो हा शहरी समज फोल ठरवला बीटरवाडीनं. चित्रपटांच्या सेटवरचा कृत्रिमपणा कितीही केलं तरी उघडा पडतो. नागराजने समृद्ध शहरांची अस्ताव्यस्त अडगळ जराही झाकायचा प्रयत्न केला नाही आणि करमाळ्याचं सौंदर्य टिपण्यात कसर सोडली नाही. हे एक यश आहे.
सैराटमधे जातीयवाद पाहणाऱ्यांच्या पावलांचे फोटो मागवले पाहीजेत. त्यांना साष्टांग नमस्कार घालावा असं मनात आहे.
दिग्दर्शक ओरडून सांगतो आहे की हा एक स्त्रीवादी चित्रपट आहे. पटाची मांडणी त्याचा आवाज आणखीन वाढवते. आर्ची या चित्रपटाचा नायक आहे. एरवी मर्दपणाचा संकेत असलेली बुलेट दुचाकी आर्ची लिलया चालवते. ट्रॕक्टर चालवते. मुलाला मागणी घालते, त्याचं रक्षण करते. असे किती अलिखीत नियम मोडलेत तिने. सैराटमधे एकही स्त्री खल व्यक्तीरेखा नाही. हैद्राबादेत गुंडांपासूनही या प्रेमवीरांचं रक्षण एक उतारवयीन बाईच करते. पण, त्या वेळेला ती तिथं कुठंही अस्तित्वात नसलेल्या अण्णाला हाक मारते. कारण, स्त्री च्या शोषणाचा आणि रक्षणाचा ठेका पुरूषांकडेच आहे. बरं, त्या बाईचा नवरा गुलाबी प्रेमानंतरच्या खऱ्याखुऱ्या संसाराच्या ओझ्याला घाबरून पळून गेला आहे. हिने खंबीरपणे परक्या संस्कृतीत मुलाला वाढवलंय. एकटीने! काय समजतं यातून?
आर्चीची मुजोर अल्लड उमरावी राजकुमारी ते मध्यमवर्गीय संसारी बाई अशी होणारी वाटचाल पाहीली का तुम्ही? किती अडचणी असतात, राव. पहील्या वेळेला सार्वजनिक संडासाला नाक मुरडून पळालेली आर्ची नंतर रुळते की त्या जगण्यात. फार हळूहळू आर्ची आणि परश्या स्थिर संसाराकडे जातात. अन्यथा नेहमीच्या चित्रपटात चक्क एका गाण्यात भणंग माणूस मेहनत करुन श्रीमंत होतो. इथं यांच्या आयुष्यातले झगड्याचे तपशील अस्वस्थ करतात.
परशा फार प्रेमळ आहे खरा. पण कसोटीच्या क्षणी त्याचा पुरूषी अहंकार जागा होतो. भर रस्त्यात तो आर्चीचा हात पिरगाळतो, कान फोडतो. मुळात आक्रमक असलेली आर्ची प्रतिकार करत नाही. उलटा हात उगारत नाही. याच मुलीने परशाला मारहाण करणाऱ्यावर गोळी झाडली होती, हे विसरायला होतं. त्या क्षणी ती फक्त एक हतबल प्रेयसी आहे.
तिथून तिला पळुन जावंसं वाटतं. ती पळते. ट्रेनमधे बसते. पुढच्या स्थानकावर भीक मागणारं एक वयस्क जोडपं पाहून कदाचित तिला तिची परीस्थिती बरी आहे असं वाटतं. ही एक सामान्य मानवी भावना आहे. आपल्यापेक्षा दुःखी माणूस पाहील्यावर माणसाला आपल्या सुखाची जाणीव होते. ती परतते. इकडं परशाने दुःख संपवण्याचा जालीम उपाय जवळ केलेलाच असतो. पण, तो ही आत्महत्येच्या भावनेवर मात करतो. प्रेमाची ताकद यालाच म्हणतात. नायिकेसाठी पाच पन्नास गुंड शिंगावर घेण्याला फिल्मी म्हटलं जातं. हा फिल्मीपणा या वेळेला आर्चीने केलेला आहे. वास्तवात देखील स्त्री ही पुरूषापेक्षा जास्त खंबीर असते असं संशोधकांचं मत आहे.
भारतीय सिनेमाचा प्रवास मेलोड्रामा ते ड्रामा आणि आता ड्रामा ते वास्तववादी चित्रण असा होतोय ही आनंदाची गोष्ट आहे. 'कोर्ट' हे त्याचं उत्तम उदाहरण. मेलोड्रामा पटांनी कितीतरी गोष्टींच्या चूकीच्या प्रतिमा आपल्या मनात भरून ठेवल्या आहेत. पोलीस, न्यायव्यवस्था हे त्याचे मोठेच बळी. पोलीस दांडग्यांना निश्चित जरा जास्त मदत करतात. पण, जो लाळघोटेपणा मेलोड्रामा पटात दाखवला जातो तशी पद्धत निश्चित नसते. त्या बाजू सावरण्याचंही चित्रण सैराटमधे टापटीप केलेलं आहे.
आर्ची निघून गेल्यानंतर तिच्या बापाच्या मानमरातबाची झालेली वाताहत, 'अर्चना' नावाच्या त्या बंगल्याचं हरवलेलं वैभव मोजक्या सेकंदात समजून जातं. साधारण तशीच अवस्था परश्याच्या घराची. मित्रांची. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करण्याची खाज असलेला आपला समाज या गोष्टींमधेच रेंगाळतो अन् त्याचे परीणामही भोगतो. प्रेम, सेक्स, नातेसंबंध यांच्याबाबत असलेल्या हजारो अलिखीत निकषांप्रती अतिसंवेदनशीलता आपल्याला इतर कुठल्या क्षेत्रात पुढंही जाऊन देत नसते. सगळं आयुष्य यातच संपून जातं.
चित्रपटाचं संगीत गाजत असलं तरीही माझ्या दृष्टीनं पार्श्वसंगीत जबरदस्त परीणामकारक आहे. शेवटच्या दीड मिनीटात वापरली गेलेली शांतता त्या लहान मुलाचा अभिनय अधिक जीवंत करते, भयाण करते. त्या दिड मिनीटासाठी दाद कोणाला द्यायची ? हा प्रश्न सुटत नाहीय. अधिक या चित्रपटात खलनायक कोण? तात्या , प्रिन्स का आणखी कोणी? हे ही समजत नाही. तुम्हाला उत्तर मिळालं तर मला आवर्जून सांगा. हे उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये जाऊन त्या वातावरणात शिरावं लागेल. मोबाईलमधे "सैराट" पाहण्यात काही मजा नाही.
::::::::::::::++++++::::::::::::
अवांतर :
जातियवादाप्रमाणेच सैराटवर किशोरवयीन मुलांना चूकीचा संदेश दिल्याचा, चूकीचे संस्कार केल्याचा आरोप केला जातोय. सोशल मिडीयावरील एका महाशयांनी "मी देखील नववीतील एका मुलीचा बाप आहे," असा सूर धरून व्हॉटस्अपवरून रींकूसहीत सर्व पोरांना संस्कारी डोस पाजले आहेत.
माझं वय तीसच्या जवळ. म्हणजे मी डोस देणाऱ्या आणि डोस पाजल्या जाणाऱ्यांच्या मधल्या पिढीतला. माझं मत असं आहे,आज जी माझ्यापुढची पिढी , जे आता ४५-५० वर्षे वयोगटातील आहेत त्यांच्यापेक्षा माझ्या मागची पिढी (१५-२० वयोगट) जास्त हुशार आणि वास्तववादी आहे. भावनेपेक्षा विचारांनी निर्णय घेण्यास आजचे किशोर - किशोरी निश्चित शिकले आहेत. आज जे भाऊ संस्कारांचे डोस देत आहेत, त्या डोसांना बहुतांशी "अभिजन" वृत्तीचा वास आहे. माधूरीने 'हम आपके है कौन'मधे पाठ उघडी टाकून दिलेली दृश्य बरी 'फ्यामिली प्याक चित्रपट' म्हणून चघळलीत. तेव्हा संस्कार कुठे गेले होते?
चित्रपटात मूलं बंड करून पळून जातात, त्यामागची कारणं काय आहेत? मुलांशी त्या रंगबेरंगी वयात संवाद साधाल की संस्कार कराल? मुलांचे आदर्श घरातच तयार होत असतात बहुतांशी. अनुकरण करण्यातुनच त्यांची मानसिकता घडत जाते.
अगदी शालेय अभ्यासक्रमात देखील संस्कार करणारा, मुलांना 'घडवणारा' वर्तनवाद २००५ सालीच मागे पडला. मुलांच्या वैयक्तिक अभ्यासशैलीला महत्व देणाऱ्या, ती फुलवणाऱ्या ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमाची घोषणा होऊन ११ वर्ष झालीत. किती शिक्षक व पालकांनी तो समजून आत्मसात केला?
मुलांच्या वागण्यात, मित्रमैत्रीणी, मोबाईलमधील माहीतीसाठ्यात रस घेणाऱ्या तथाकथित सुजाण व जागृत पालकांनी मुलांची क्रमिक पुस्तकं उघडून तरी पाहीलीत का कधी? त्या पोरांचे अभ्यासक्रम बघाल तर डोळ्यांसमोर चिमण्या उडतील. "अभ्यास करा, अभ्यास करा" या पालूपदाच्या जोडीने आपल्या आयुष्याचं रडगाणं गाताना त्यांच्यासोबत कधी अभ्यासाला बसलात का? कधी त्यांच्या आवडी-निवडीत रस घेतलात का?
फक्त वयाने मोठे म्हणून भाषणं ठोकण्यापेक्षा मुलं जशी व्हावीत असं वाटतं तसं आधी आपण बनायचा प्रयत्न केले पाहीजेत. त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडींबाबत सुसंवाद ठेवला पाहीजे. मग, असे कितीही सैराट आले तरी मग 'सुसंस्कारी' पोरं बिघडणार नाहीत. बरं, एक अजून गोष्ट. सैराट मधे जेव्हा आर्ची परश्या सोबत प्रदीप आणि सल्या पळून जातात तेव्हा ते सल्याच्या एका नातेवाईकाकडे आसरा शोधतात. शहीद्या त्यांना म्हणतो ," काय रं. आई-बापानं तुम्हाला शिकवलं काय, तुम्ही करताय काय?"
ज्या मुलांना मराठी नीट समजत असेल तर ते यातून योग्य तो बोध घेतील, अन्यथा मुलांना कॉन्व्हेंटच्या वाळवंटात ढकलून मराठी शाळा ओस पाडणारी आणि मराठीला दोन पाऊलं मागं ढकलणारी पिढी कुठली, यावरही चिंतन करायची गरज पडणार.