Search This Blog

Tuesday, December 27, 2016

बेरोजगार तरूण बनला 'शंकराचार्य'. राज्यातील सर्व स्टार्टअपस् ला मागे टाकून उत्पन्नाबाबतीत जोरदार घोडदौड.

सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील एका युवकाने एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे आजवरचे जिल्ह्यातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सुरेंद्र माळकर या बेरोजगार युवकाच्या कामगिरीमुळे त्याचे सर्व भक्तगण अतिशय आनंदीत आहेत.
      सुरेंद्र हा एक अतिशय बोलघेवडा व साधारण बुद्धीचा तरुण सावंतवाडीतील एका खेड्यात वाढला. शासकीय नोकरीत शिपाई म्हणून चिकटण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले परंतु त्यात त्याला यश आले नाही. "लेखी परीक्षेऐवजी बोलकी अंडी फेकायची असती तर मी नक्कीच यशस्वी ठरलो असतो", असं त्याचं म्हणणं आहे. त्याला कोकणात असलेल्या प्रथेप्रमाणे मुंबई-पुण्याकडे कामासाठी जाणे अनिवार्य होते. परंतु, ही गोष्ट मान्य नसल्याने गावालाच काहीतरी उद्योगधंदा चालू करावे असे त्याच्या मनात आले. नंतर सरकारची स्टार्टअप पॉलीसी तितकीशी दिलासादायक नसल्याचे त्याला त्याच्या मित्रांनी सांगितले. अशा अवघड परीस्थितीत एका जनमान्य स्थानिक सद्गुरुंनी त्याला शंकराचार्य पद विकत घेण्याचा सल्ला दिला. शिपाई बनण्यासाठी 'सेटींग' करता राखून ठेवलेले पैसे खर्च करून तो 'शंकराचार्य' बनला. "सरकारी नोकऱ्यांत हल्ली फार राम राहीला नाही. नेत्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने वशीला चालत. शिवाय मरणाचं काम करावं लागतं. म्हणून शंकराचार्य बनण्याचा निर्णय घेतला.  सद्गुरु कृपेने यात कसलीही बाधा आली नाही," असं फार श्रद्धेने कान नाक घशाला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करत त्याने सांगितले. (यात त्याने नाकातला मेकूडही साफ केला असं आमच्या प्रतिनीधीला वाटलं.)
     शंकराचार्य बनण्यासाठी झालेला खर्च सहा महीन्यांतच वसूल करून त्याने नफा कमावण्यास सुरूवात केली. एवढ्या कमी वेळात ब्रेक इव्हन पॉईंट असलेला अन्य उद्योग नसावा असं त्याचं ठाम मत आहे.
     " शंकराचार्य सुरेंद्रानंद सरस्वती" असे नामाभिधान धारण केलेल्या सुरेंद्र माळकरच्या यशाने त्यांच्या भक्तगणांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सुरेंद्रच्या यशाचे गमक विचारले असता त्याने ते सांगण्यास नकार दिला.
      त्याच्या मठाचा अभ्यास करणाऱ्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहीतीनुसार 'फेसबुक' व 'व्हॉटसअप' यामुळे सुरेंद्र यशस्वी झाला आहे. त्या पंचक्रोशीत इंटरनेट नसताना सुरेंद्रने कुठूनसे सॕटेलाईट कनेक्शन मिळवले आहे. त्याद्वारे व्हॉटस्अपवर येणारे फुलाफुलांनी नटलेले शुभ सकाळ टाईपचे संदेश तो भक्तगणांना "गुरूबोध" या कार्यक्रमात मोबाईल लपवून वाचून दाखवतो. मुळच्या बोलक्या स्वभावामुळे या आयत्या अंड्यांना तो उत्कृष्ट फोडणी देऊन सादर करतो. यामुळे भक्त शंकराचार्य सुरेंद्रानंदावर फार भाळले असल्याचे समजते.

Friday, December 2, 2016

फेलोशीप

तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे?
मी मुंबई महापालीकेत सध्या कार्यरत आहे. परंतु, मी मूळ रत्नागिरी जिल्ह्याचा रहीवासी आहे. भारताच्या विकासाच्या वाटा गावांमधून जातात, असं माझं ठाम मत बनलं आहे. गावांचा विकास अस्ताव्यस्त होऊ नये, यासाठी विविध प्रकारच्या ज्ञानशाखांच्या उपयोजनाची गरज सध्या भासते. समाजात सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अमूक एक गोष्ट केली तर विकास गतिमान व सुयोग्य पद्धतीने होईल अशी संकल्पना असते. माझ्या मनातील ग्रामविकासाच्या संकल्पना आजमावून पाहण्यासाठी ग्रामविकास फेलोशीप ही एक उत्तम संधी आहे याची मला खात्री वाटते.

स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
माझं लहानपणाचा बराचसा काळ मी एका कोकणी खेड्यातील आजोळी व्यतीत केला आहे. तसंच इंजीनीअरींगच्या शैक्षणिक काळापासून बऱ्याचदा दुर्गम भागात निवासी ट्रेकींगसाठी जाण्याचेही योग आले. यावेळी पाहीलेल्या गावांच्या स्थितीत बदल घडावा असं मला नेहमी वाटत आलं. यासाठी मी माझी नोकरी सांभाळून संजय यादवराव यांच्या 'कोकणभूमी प्रतिष्ठान' ने आखलेल्या 'समृद्ध कोकण अभियान' मध्ये सहभाग घेतो. स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. राजेंद्रसिंह आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या जलचेतना मोहीमेत मी स्थापत्य अभियांत्रिकीचे ज्ञान वापरून ग्रामविकासाचे प्राथमिक आराखडे बनविण्यात माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. यात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते संगणकावरील सादरीकरण अशा सर्व बाबींचा समावेश होतो. शासकीय यंत्रणेचा अंतर्गत अनुभव ही माझी जमेची बाब आहे.

फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?
गावांचे येत्या काळात शहरीकरण अटळ आहे. परंतु, त्यात गावांचे बकालीकरण होऊ नये. ग्रामीण भागात जपल्या गेलेल्या काही शाश्वत मूल्यांचे, संस्कृतीचे व सर्वांत महत्वाचं म्हणजे निसर्गाचे संवर्धन व्हावे , ग्रामविकासाची प्रक्रीया संतुलित राहावी यासाठी एक लवचिक चौकट बनवता येईल का प्रश्नावर माझा भर आहे. एक वर्षाच्या फेलोशीपच्या काळात याबाबतचे बरेचसे ज्ञान माझ्याकडे संकलीत होईल ज्याचा लाभ शासन, ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या असलेल्या व्यक्ती व संस्थांना देणे शक्य होईल.

Wednesday, November 23, 2016

संन्याश्याची कफनी आणि विनोदी राजा.

एका महान राष्ट्रात एक अतिशय निसर्गसुंदर प्रदेश होता. दुर्गम, रमणीय डोंगर ते लखलखत्या रूपेरी वाळूचे किनारे असं सर्व काही त्या चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्याला निसर्गानं बहाल केलेलं होतं. पण, या देखण्या भूभागाला एक शाप होता. हा भाग गरीब होता. या भागातली हुशार आणि कष्टाळू तरूणाई देशाच्या इतर मायानगरीत वाहून जात असे. पावसाचं धो-धो पाणी त्या जमिनीवर फार काळ टिकत नसे. या प्रदेशाने पूर्वी फार तल्लख व चिवट सुभेदार देशाला दिले होते. पण, आता तशी परीस्थिती नव्हती.
      या शापीत निसर्गरम्य भागात एक संन्यासी राहात होता. पंचावन्न वर्षांच्या या संन्याश्याने असंख्य गरीब , गरजू शिष्यांना जीवनाचा राजमार्ग दाखवला होता. त्याचे शिष्यही गुरुविषयी फार कृतज्ञता बाळगून होते.
      या संन्याश्याकडे एकच जूनी कफनी होती. पण, ती कफनीही त्याला अतिशय शोभून दिसत असे. त्यातून त्याचे ७०% अंग झाकले जात असे. बाकी ३०% ची त्याला चिंता नव्हती.
      त्याची किर्ती राजाने फार ऐकली होती. अचानक एके दिवशी त्याला राजाचा निरोप आला. निरोप कसला, राजाचा आदेशच जणू. "महंत, आम्ही आपली किर्ती फार ऐकून आहोत. पण, आपण तीच ती जूनी कफनी परीधान करता हे आम्हास काही पटत नाही. आपण ती जूनी कफनी ताबडतोब फेकून द्यावी. आम्ही लागलीच तुमच्यासाठी तलम रेशमी कफनी पाठवतो आहोत."
      संन्यासी विचारात पडला." अरेच्च्या, ही कफनी माझ्यासाठी शुभलक्षणी आहे. जून्या राजाने मला ती दिली आहे. या कफनीच्या सोबतीने मी चार पिढ्या घडवल्या. आता ही तलम रेशमी कफनी मला हवीच आहे. पण, ही जूनी कफनी मी काही फेकायचा नाही."
       त्याने ही गोष्ट त्याच्या लाडक्या शिष्यांना कळवली. राजाचा असा विचित्र आदेश ऐकून ते ही अवाक झाले. त्यांनी लगेचच चर्चेतून राजाचा आदेश कसा अयोग्य आहे, याबाबत मुद्देसूद खलीता तयार करून राजाला पाठवला. पण, राजा फारच हट्टी होता. त्याने उलट निरोप धाडला."महंत, तुम्हाला तलम रेशमी कफनीच वापरावी लागेल. जूनी वापरता येणार नाही."
      संन्यासी आणि शिष्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही, राजाने तलम रेशमी कफनी स्थानिक सुभेदारांकरवी पाठवली आणि जूनी हिसकावून जाळून टाकली. संन्याशाने पाहीलं, ती मलमली कफनी फारच पारदर्शक होती. ती घातल्यावरही माणूस उघडा नागडाच वाटेल. संन्याशाने याबाबत त्याने सुभेदारांकडे विचारणा केली तर ते दरडावणीच्या स्वरात उत्तरले," हे बघ गोसावड्या, असले फालतु प्रश्न करू नको. राजाचा राजशिंपी फार कामात असतो. त्याला जेवढा वेळ मिळाला त्यात त्याने हे एवढं करून दिलं याची जाण ठेव. नाहीतर घालायला कपडाही मिळाला नसता.  सगळे जूनाट कफनी, अंगरखे जाळायचे राजाचे आदेश आहेत"
       त्या तलम रेशमी कफनीसोबतच राजाने  देशावरचे नविन शिष्यही पाठवून दिले. संन्याश्याचा आश्रम त्या नवीन शिष्यगणांनी भरून गेला. ते विद्यार्थी अंगापिंडाने मजबूत आणि दांडगट होते. त्यांनी संन्याश्याकडील स्थानिक शिष्यांना हूसकावून लावले.
     संन्यासी या धक्क्यातून आजही सावरला नाही. त्याचा जीव दांडगट विद्यार्थ्यांनी हूसकावून लावलेल्या त्या कोवळ्या विद्यार्थ्यांमधे अडकला होता.

खेळ मांडला.

हा. मी नियम समजावून सांगतो. प्रत्येकाला बॕटींग मिळाली पाहीजे. ११
१. आऊट होयपर्यंत बॕटींग.
२. एक टप्पी कॕच आऊट.
३. स्टंपच्या मागे रन्सी नायत.
मितरोssssss मी सांगतो त्या पद्धतीने खेळलाव तर बॕटींग मिळणार सगळ्यांना..
(खेळ सुरू झाल्यावर थोडा वेळाने)
धनू काळ्या आऊट होत नाय. त्याने बाकीच्यांच्या विकेट घेतलान. आजून नियम .
४. लाईटच्या वायरींच्या वरन जाईल इतका वर बॉल मारला तर आऊट.
५. टिपी रन कंपळ्सरी.. बॕटला बॉल लागला की धावायचंच.
६. चाळीच्या खिडक्यांना बॉल लागला तरी आऊट.
हं. आता खेळा.
(परत थोडा वेळाने.. धनू काळ्या आऊट होत नाय. परत नविन नियम.)
७. आता चाळीच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला लागला तर आऊट.
८. दोन टप्पी कॕच पण आऊट..
हं खेळा आता..
.
.
.
.
नियम बनत राहीले. बाकीच्यांच्या विकेट जात राहील्या, धनू काळे काही आऊट झाला नाही. संध्याकाळ झाली. खेळ संपला. तरी धनू काळे नाबाद.

Friday, August 5, 2016

अटकखिंडीत अडकलेल्या अभियंत्यांची व्यथा

महाराष्ट्रात स्थापत्य अभियांत्रिकी शिकवणाऱ्या सर्व तंत्रविद्यालयांनी आता " नेतेप्रणित विविध शासकीय घोटाळ्यांमध्ये कापण्यासाठी आयते बकरे येथे तयार करून मिळतील" अशी पाटी लावायला हरकत नाही. महाडमध्ये पूल कोसळण्याच्या घटनेचा दोष १००% अभियंत्यांच्या माथी बसणार आहे.

रस्त्यांना खड्डे पडले, करा अटक.
पूल कोसळले, करा अटक.
इमारत कोसळली, करा अटक.
पाणी येत नाही, करा अटक.

         स्थापत्य अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची सर्वात जूनी व नागरी सुविधांशी थेट जोडलेली शाखा आहे. मुलभूत नागरी सोयीसुविधा पुरवण्यात स्थापत्यच्या अनेक उपशाखा (जलअभियांत्रिकी, स्ट्रक्चरल, दळणवळण अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी इ.) सतत कार्यरत असतात. निसर्गानंतर कोणी निर्माते असतील तर ते असतात स्थापत्य कलाकार. जगातील सातही आश्चर्ये स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय कौशल्यांचे नमूने आहेत. जागतिक वारसास्थळे मानल्या जाणाऱ्या वास्तू असोत की लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे, मशीदी , चर्चेस, अग्यारी..  सारं काही स्थापत्यनिर्माणेच आहेत. डॉक्टर पेशाला समाजात देवासमान मानलं जातं. राहायला घरं, दळणवळणाच्या सोयी, धरणं पाणी, वीज उपलब्ध करुन देणाऱ्या अभियंत्यांना काय मानलं जातं?

      आज महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाची अवस्था काय आहे? एके काळी दर्जेदार अभियंते तयार करणाऱ्या शासकिय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचं उदाहरण घेऊया. पदविका अभ्यासादरम्यान प्रत्येक विषयासाठी शिक्षक मिळालेली माझी कदाचित शेवटची बॕच. आम्ही श्री. आट्ये यांच्या देखरेखीखाली शिकलो. २००५-०६ नंतर बहुतेक शिक्षक बदली गेले आणि नंतर त्यांची जागा घ्यायला कोणी स्थायी रूपानं आलंच नाही. श्री. हे संस्थेचेच माजी विद्यार्थी आता संस्थेच्याच माजी विद्यार्थांच्या सहाय्याने स्थापत्य शाखेचा गाडा गेली दहा वर्ष रेटत आहेत. मी रत्नागिरीत असताना मी एक टर्म शिकवलं. असेच माझे रत्नागिरीत असलेले ज्यूनियर सिनीयर आपापली कामं सांभाळून इमानदारीनं  शिकवतात. पण, ते संस्थेशी असलेली बांधिलकी म्हणून. पवार सर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून न थकता प्रयत्न करत असतात. पण, नेते म्हणून मिरवणाऱ्या कोणीही या संस्थेला आवश्यक शिक्षक वर्ग, मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून फारसे कष्ट घेतलेले नाहीत. अशा वातावरणात शिकणारे विद्यार्थी खरंच किती कुशल अभियंते बनतील?
      हीच अवस्था इतर शासकिय व खाजगी विद्यालयांत आहे. यात पुणे अभियांत्रिकी, वीरमाता जीजाबाई हे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद. विद्यालयांत नीट शिकता न आल्यानं या मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. नोकरी लागल्यानंतर समाजात प्रतिष्ठेनं जगायचं असतं. हाताशी दहा गुंड बाळगणाऱ्या एखाद्या पाचवी नापास नेत्याला मी अमूक काम नियमात बसत नाही, मी ते करणार नाही, असं सांगायचं धैर्य कुठून येईल? एक सामान्य ज्ञानाची परीक्षा पास करून प्रशासकीय अधिकारी म्हणून बसलेला माणूस एका भूरचना अभ्यासकाला अमूक एक डोंगर कोसळण्याची शक्यता नाही, असा अहवाल देण्यासाठी जबरदस्ती करतो , त्याचं सल्लाशुल्क अडवून ठेवतो तेव्हा काय करायचं?

      मित्रांनो, नोकरी वाचवण्याच्या नादात आपण नडायचं विसरतोय आणि आगीतून फुफाट्यात पाय टाकतोय. एखादी गोष्ट नसेल येत, नसेल जमणार तर नाही म्हणणं आपल्याला शक्य होत नाही. स्वतःच्या तुमड्या भरण्यापलीकडे समाजासाठी कुठलंही ध्येय, द्रष्टेपण नसणाऱ्या अर्धशिक्षित पुढाऱ्यांचे आदेश कागदावर लिखीत नसतील तर स्विकारायचेच नाहीत, असं ठरवूनच काम केलं पाहीजे. पुरवलेल्या सुविधा कमी असतील, एखादं काम धोकादायक असेल तर ते देखील छापील स्वरूपात जाहीर करायची सवय करावी लागेल.

       अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षणातही ज्ञानरचनावादाची पेरणी करावी लागेल. आपली कामं सांभाळून फुलणाऱ्या अभियंत्यांना आपण मेंटॉरींग करू शकतो का? आधुनिक संगणक, दृकश्राव्य माध्यमांतून आपण त्यांना मार्गदर्शन पुरवू शकतो का?

       नेता किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणवणाऱ्या कोणत्याही अर्धवट हळकूंडाला "तांत्रिक अभ्यासाचा विषय असेल लायकीत रहा" म्हणायची ताकद हवी असेल तर किमान राज्यस्तरावर आपली एकी व आवाज पाहीजे. त्याचवेळी आपल्यातील नासक्या आंब्यांनाही आवर घालायला लागेल. नाहीतर, आपण असेच एकेकटे खिंडीत गाठले जाऊन मारले जाऊ.