Search This Blog

Friday, August 5, 2016

अटकखिंडीत अडकलेल्या अभियंत्यांची व्यथा

महाराष्ट्रात स्थापत्य अभियांत्रिकी शिकवणाऱ्या सर्व तंत्रविद्यालयांनी आता " नेतेप्रणित विविध शासकीय घोटाळ्यांमध्ये कापण्यासाठी आयते बकरे येथे तयार करून मिळतील" अशी पाटी लावायला हरकत नाही. महाडमध्ये पूल कोसळण्याच्या घटनेचा दोष १००% अभियंत्यांच्या माथी बसणार आहे.

रस्त्यांना खड्डे पडले, करा अटक.
पूल कोसळले, करा अटक.
इमारत कोसळली, करा अटक.
पाणी येत नाही, करा अटक.

         स्थापत्य अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची सर्वात जूनी व नागरी सुविधांशी थेट जोडलेली शाखा आहे. मुलभूत नागरी सोयीसुविधा पुरवण्यात स्थापत्यच्या अनेक उपशाखा (जलअभियांत्रिकी, स्ट्रक्चरल, दळणवळण अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी इ.) सतत कार्यरत असतात. निसर्गानंतर कोणी निर्माते असतील तर ते असतात स्थापत्य कलाकार. जगातील सातही आश्चर्ये स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय कौशल्यांचे नमूने आहेत. जागतिक वारसास्थळे मानल्या जाणाऱ्या वास्तू असोत की लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे, मशीदी , चर्चेस, अग्यारी..  सारं काही स्थापत्यनिर्माणेच आहेत. डॉक्टर पेशाला समाजात देवासमान मानलं जातं. राहायला घरं, दळणवळणाच्या सोयी, धरणं पाणी, वीज उपलब्ध करुन देणाऱ्या अभियंत्यांना काय मानलं जातं?

      आज महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाची अवस्था काय आहे? एके काळी दर्जेदार अभियंते तयार करणाऱ्या शासकिय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचं उदाहरण घेऊया. पदविका अभ्यासादरम्यान प्रत्येक विषयासाठी शिक्षक मिळालेली माझी कदाचित शेवटची बॕच. आम्ही श्री. आट्ये यांच्या देखरेखीखाली शिकलो. २००५-०६ नंतर बहुतेक शिक्षक बदली गेले आणि नंतर त्यांची जागा घ्यायला कोणी स्थायी रूपानं आलंच नाही. श्री. हे संस्थेचेच माजी विद्यार्थी आता संस्थेच्याच माजी विद्यार्थांच्या सहाय्याने स्थापत्य शाखेचा गाडा गेली दहा वर्ष रेटत आहेत. मी रत्नागिरीत असताना मी एक टर्म शिकवलं. असेच माझे रत्नागिरीत असलेले ज्यूनियर सिनीयर आपापली कामं सांभाळून इमानदारीनं  शिकवतात. पण, ते संस्थेशी असलेली बांधिलकी म्हणून. पवार सर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून न थकता प्रयत्न करत असतात. पण, नेते म्हणून मिरवणाऱ्या कोणीही या संस्थेला आवश्यक शिक्षक वर्ग, मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून फारसे कष्ट घेतलेले नाहीत. अशा वातावरणात शिकणारे विद्यार्थी खरंच किती कुशल अभियंते बनतील?
      हीच अवस्था इतर शासकिय व खाजगी विद्यालयांत आहे. यात पुणे अभियांत्रिकी, वीरमाता जीजाबाई हे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद. विद्यालयांत नीट शिकता न आल्यानं या मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. नोकरी लागल्यानंतर समाजात प्रतिष्ठेनं जगायचं असतं. हाताशी दहा गुंड बाळगणाऱ्या एखाद्या पाचवी नापास नेत्याला मी अमूक काम नियमात बसत नाही, मी ते करणार नाही, असं सांगायचं धैर्य कुठून येईल? एक सामान्य ज्ञानाची परीक्षा पास करून प्रशासकीय अधिकारी म्हणून बसलेला माणूस एका भूरचना अभ्यासकाला अमूक एक डोंगर कोसळण्याची शक्यता नाही, असा अहवाल देण्यासाठी जबरदस्ती करतो , त्याचं सल्लाशुल्क अडवून ठेवतो तेव्हा काय करायचं?

      मित्रांनो, नोकरी वाचवण्याच्या नादात आपण नडायचं विसरतोय आणि आगीतून फुफाट्यात पाय टाकतोय. एखादी गोष्ट नसेल येत, नसेल जमणार तर नाही म्हणणं आपल्याला शक्य होत नाही. स्वतःच्या तुमड्या भरण्यापलीकडे समाजासाठी कुठलंही ध्येय, द्रष्टेपण नसणाऱ्या अर्धशिक्षित पुढाऱ्यांचे आदेश कागदावर लिखीत नसतील तर स्विकारायचेच नाहीत, असं ठरवूनच काम केलं पाहीजे. पुरवलेल्या सुविधा कमी असतील, एखादं काम धोकादायक असेल तर ते देखील छापील स्वरूपात जाहीर करायची सवय करावी लागेल.

       अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षणातही ज्ञानरचनावादाची पेरणी करावी लागेल. आपली कामं सांभाळून फुलणाऱ्या अभियंत्यांना आपण मेंटॉरींग करू शकतो का? आधुनिक संगणक, दृकश्राव्य माध्यमांतून आपण त्यांना मार्गदर्शन पुरवू शकतो का?

       नेता किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणवणाऱ्या कोणत्याही अर्धवट हळकूंडाला "तांत्रिक अभ्यासाचा विषय असेल लायकीत रहा" म्हणायची ताकद हवी असेल तर किमान राज्यस्तरावर आपली एकी व आवाज पाहीजे. त्याचवेळी आपल्यातील नासक्या आंब्यांनाही आवर घालायला लागेल. नाहीतर, आपण असेच एकेकटे खिंडीत गाठले जाऊन मारले जाऊ.