रिनर मारीया रिल्के या सुप्रसिद्ध जर्मन कवीने त्याचा शिष्य फ्रँझ कापुस्स याला काव्यनिर्मिती, सर्जनशिलता याबाबत दहा पत्रांद्वारे जे अनमोल मार्गदर्शन केलं ते "लेटर्स टू अ यंग पोएट" या नावाने जागतिक साहीत्यात दर्जेदार कलाकृतीत (world classics) समाविष्ट झालं. अशाच शिर्षाखाली अनेक प्रकारची पुस्तकं नंतरच्या काळात निघाली. त्यापैकीच एक डॉ. एडवर्ड ओ. विल्सन यांचं "लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट".
डॉ. विल्सन यांनी एक कुणी विशिष्ट व्यक्तीला संबोधून ही मार्गदर्शनपर पत्रं लिहीण्याऐवजी जगात प्रत्येकात लपलेल्या एका संशोधकाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात आपला आयुष्याचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तीला जशा अडचणीं असतात तशाच त्या एका संशोधकाला/ शास्त्रज्ञालाही असतात. वाढत्या वयात घरातून, आजूबाजूच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परीस्थितीतून आपल्यावर संस्कार होत असतात. काही गोष्टी आपण स्वतःहून शिकत असतो. तसाच लहानगा एडवर्ड घराच्या आजूबाजूच्या परीसरात हिंडताना किटक, फूलपाखरं यांच्या प्रेमात पडला. कधी कुठले समूह जंगलात फिरायला नेणारा वाटाड्या , कधी सर्प प्रदर्शन भरवणारा एक किशोरवयीन मार्गदर्शक असे प्रकार करत एडवर्ड "हार्वर्ड" या जगविख्यात विद्यापिठात पदवी मिळवण्यासाठी दाखल झाला आणि पुढे याच विद्यापिठात "evolutionary biology" उत्क्रांती जैवशास्त्र या नव्याच विद्याशाखेचा जन्मदाता बनला.
हा सर्व प्रवास जितका खडतर आणि मोठा आहे तितकाच रोमांचकही. या साठ वर्षांच्या प्रदीर्घ धावपळीनंतर आलेले अनुभव डॉ. विल्सन आपल्यासमोर मांडतात. जगाला एखाद्या विषयातील मुलभूत ज्ञान पुरवणारा एक संशोधक कसा तयार होतो, याचं झकास वर्णन या पुस्तकात आहे.
"मुंग्या" या विषयावर एखादा माणूस आयुष्य खर्च करू शकतो हेच आधी आपल्या भारतीय मेंदूला झेपणारे नाही. आपलं घर, संसार आणि वैयक्तिक आयुष्य जपत आठवड्याचे साठ तास काम करणं ही एक भयानक कसरत आहे, असं मान्य करतानाच वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध कुणाशी व किती जपायचे यावरही डॉ. विल्सन भाष्य करतात.
लहानग्या एडवर्डच्या बाबतीत सर्वात भारी काय वाटलं असेल तर ते त्याला त्याच्या आवडीनुसार जगण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य. भले ते पालकांच्या काहीशा दुर्लक्षपणानं असेल पण एडवर्डला कुठलेही क्लास, ट्युशन्स छंदवर्गांना जावं लागत नसे. कुठल्या काका, मामा, मावश्यांकडे जावं लागत नसे. सुटी व फावला वेळ एडवर्ड फुलपाखरांच्या मागे धावण्यात व त्यांचा काही प्रसिद्ध पुस्तकांतून अभ्यास करण्यात घालवत असे. फुलपाखरं व किटक पकडणे त्यांच्या नोंदी ठेवणे हे उद्योग तो आपसुक शिकला.
"जिथे गर्दी कमी, तिथे मी" या न्यायाने एडवर्ड 'मुंगी' या विषयावर मुलभूत संशोधन करू लागला आणि अल्पावधीतच त्यातील तज्ञ म्हणून मान्यता पावला. कळपाची मानसिकता धुडकावून वेगळ्या वाटेने जाणाऱ्यांचं यश आणि अपयशही अगदी खास असतं. 'नेचर' आणि 'सायन्स' या दिग्गज नियतकालीकात अपयशी प्रयोगांबाबत प्रसिद्ध झालेल्या मोजक्या शोधनिबंधात एडवर्डचा एक निबंध होता. जो प्रयोग नंतर एका शास्त्रज्ञाने बऱ्याच खटपटींनी सिद्ध केला.
जंगलं हीच प्रयोगशाळा असं मानणाऱ्या एडवर्डला दक्षिण अमेरीकेला त्रास देणाऱ्या 'आग्या' मुंग्यावर उपाय शोधायचा होता. तेव्हा प्रयोगासाठी जमा केलेल्या मुंग्यांनी त्याचे हात फोडून काढले होते. अशा अनेक करामतींच्या उदाहरणांनी डॉ. विल्सन संशोधनाचा प्रवास आपल्याला सांगतात.
माधुरी शानभाग यांनी या उत्कृष्ट मार्गदर्शनपर पुस्तकाचा तितकास शानदार मराठी अनुवाद केला आहे. फक्त विज्ञानाऐवजी सायन्स या शब्दाचा अतिरीक्त वापर खटकतो.
राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या अनुवादीत पुस्तकात एकूण १७४ पाने असून किंमत रु. २०० इतकी आहे.