Search This Blog

Tuesday, October 27, 2015

विज्ञान विरूद्ध समाज.

       २०१५ च्या जूलै महीनाअखेर चित्रपटगृहांमध्ये "देऊळबंद" नावाचा एक मराठी चित्रपट झळकला होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या पठडीतील जाहीरात मोहीमांपेक्षा थोडीशी वेगळी वाट याच्या प्रसिद्धीसाठी वापरली गेली होती. फेसबूक आणि व्हॉटस्अप या सोशल नेटवर्कींग साईट्सचा प्रभावी वापर करण्यात आला होता. यामधे फेसबूकवर झकास रंगसंगती असलेले वॉलपेपर्स व काही मोजक्या शब्दांतील पोस्ट फिरवण्यात आल्या होत्या आणि व्हॉटस्अपवर बऱ्यापैकी विस्तारीत लघूलेखात स्वामी समर्थांच्या भक्तांना भावनिकदृष्ट्या चित्रपटगृहांमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. 
     स्वामी समर्थांचा भक्तसंप्रदाय महाराष्ट्रभर पसरला आहे. त्यांचे छोटे-मोठे मठ अनेक गावांत आढळून येतात. या मठांच्या स्वयंसेवकांना 'सेवेकरी' म्हटलं जातं. चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहीमेत या सेवेकऱ्यांना दर्शकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी खास आवाहन करण्यात आलं होतं. हा चित्रपट दहा कोटी रूपयांपर्यंत गल्ला जमवण्यात यशस्वी झाला, असं त्याच्या फेसबूक अकाउंटवर नमूद करण्यात आलं होतं. चित्रपट आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी आधुनिकीकरण तंत्रज्ञान व तगड्या पटकथेपेक्षा देवाच्या भावनिक लेबलखाली सेवेकऱ्यांना कामाला लावण्यात आलं, असं म्हणता येईल.
      इतका हवा करण्यात आलेल्या या चित्रपटाविषयी खूप कुतूहल वाढलं होतं. पण, दोन-चार दिवसात हा एक तद्दन दुय्यम दर्जाचा चित्रपट असल्याची टिका समीक्षणांमधून होऊ लागली. चित्रपटात अतिशय बालीश असे युक्तीवाद पटकथालेखक आणि दिग्दर्शकांनी स्वामी समर्थ बनलेल्या मोहन गोखले यांच्या तोंडी कोंबून एक प्रकारे स्वामी समर्थ या विभूतीचा अपमानच केला आहे. यावर स्वामी समर्थ भक्तांनी पटकथाकार आणि दिग्दर्शकांना जाब विचारायचं सोडून चित्रपट डोक्यावर घेतला.
       स्वामींचे भक्त हे स्वामींना कोणी काही बोलले तर राडा घालणारे असतात, प्रसंगी त्यांना पोलीसांचा मार बसला तरीही स्वामी त्या भक्ताच्या मदतीला येत नाही, देव न मानणाऱ्यालाच देव भेटायला येतो, असे संदेश प्रसारीत करणाऱ्या या चित्रपटाने विज्ञानाला दुय्यम लेखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. विज्ञानाने जे चित्रपट तंत्र विकसित केलं त्याचा वापर करून विज्ञानाशीच टक्कर घेण्याचा हा अट्टाहास हास्यास्पद वाटतो. बायनरी कोडींग, विमानं या बद्दलही आपलं तोकडं ज्ञान स्वामींच्या तोंडून पाजळून चित्रपट निर्मात्यांनी नक्की कोणाची उपेक्षा केली?
        हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण झालं. व्हॉटस्अप, फेसबूकवरही तंत्रज्ञानाच्या मर्यादा सिद्ध करण्यासाठी रचलेल्या खोट्या नाट्या कथा फिरत असतात. त्या रचणाऱ्या मूर्खांनी कमीतकमी आपल्याला विज्ञानाने जे दिलं त्याबाबत तरी कृतज्ञ रहायला हवंय.
     विज्ञानाचा विकास हा एक प्रवास आहे आणि तो अखंड चालू रहाणार आहे. विज्ञानाशी बांधिलकी जपणाऱ्यांना त्या त्या काळातील विज्ञानाच्या मर्यादा पक्क्या माहीत असतात. विज्ञानाला अकारण नावं ठेवणाऱ्यांचं आयुष्य बारीकसारीक वैज्ञानिक उपकरणं आणि तंत्रज्ञानानेच व्यापलेलं असतं. फक्त त्यांना त्याची जाणिव नसते.
      तंत्रज्ञान नसतं तर सण सोहळे, भक्ती सत्संग वैगरेची दुकानं लावायला वीज, चमचमत्या वीजमाळा, सजावटीचं सामान इत्यादी गोष्टी कुठून आल्या असत्या? त्या-त्या काळातील भक्तीमार्गाचे चोचले तत्कालीन विज्ञान-तंत्रज्ञानानेच पुरवले आहेत. भक्तीमार्ग हा एक मोठा बाजार व अर्थव्यवस्था आहे. विज्ञान-तंत्रज्ञान त्याला पाठबळ पुरवत स्वतःही विकसित होत असतं.
     माणसाने प्रथम जेव्हा स्वतःहून अग्नी चेतवला असेल त्या काळापासून ते आताच्या रॉकेटच्या इंधनापर्यंत विज्ञानाने प्रगतीच केली आहे. धार्मिकता  आणि सत्तापिपासूपणाच्या अंधारात वैज्ञानिक विकास तसा आतापर्यंत दुर्लक्षितच राहीला. इतिहासाच्या पानांवर आणि सामाजिक जीवनात धार्मिक रूढी परंपरा आणि युद्धे लढाया यांचा जेवढा गवगवा आजही करण्यात येतो त्यानुसार भारतीय आणखी पाचशे वर्ष अज्ञान आणि कळपाच्या मानसिकतेत रूतलेले राहणार याबाबत कोणाला शंका नसावी.
        शिकारीसाठी पहिल्यांदा शस्त्र निर्माण करणारा, ओबडधोबड कसं का होईना घर बनवणारा मानव हा संशोधकच होता. ज्या व्यक्तीला विश्वाच्या कार्यपद्धतीविषयी कुतूहल वाटतं आणि जो आपल्या परीने त्याचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असतो, असा प्रत्येकच जण विज्ञानाच्या प्रगतीत योगदान देत असतो. एक्स रे चा शोध लावणारा विल्यहेम रॉन्टजेन कोणत्याही प्रकारे ठरवून शोध लावत नव्हता. पण, त्याच्या शोधाचा आपण आज वैद्यकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये फार वापर करतो. प्रत्येक गोष्टीत बाजारीकरण घुसलेल्या आजच्या जगात "ठरवून" केलेल्या संशोधनांचं प्रमाण वाढतं आहे. याचं कारण म्हणजे अमूक एक प्रकारची 'तत्वनिष्ठता' (जात, वंश, धर्म, राष्ट्रीयत्व, मार्क्सवाद , भांडवलशाही इ.) जोपासणाऱ्या सरकार आणि प्रशासनांनी अवलंबलेली धोरणं. त्यात समाजाची विज्ञानाप्रतिची उदासिनता या गंभीर परीस्थितीत भर घालते आहे. अमेरीकन लष्कराच्या एका महीन्याच्या खर्चाइतकाही वार्षिक अर्थसंकल्प नसणाऱ्या "नासा"या संशोधन केंद्राच्या आर्थिक तरतूदीत अमेरीकेने यावर्षी ३० कोटी डॉलर्स इतकी अतिरीक्त कपात केली आहे. कित्येक प्रगत व विकसनशील राष्ट्रांची मुलभूत संशोधनांतली गुंतवणूक सकल राष्ट्रीय उत्पन्नांच्या (GDP) ०.५% पेक्षाही खाली घसरली आहे. अशाच कारणांमुळे असेल कदाचित, आईनस्टाईनच्या सामान्य व विशेष सापेक्षता सिद्धांतासारखा एकही धमाकेदार शोध गेल्या शंभर वर्षांमधे लागू शकलेला नाही.
       वैज्ञानिकांना योद्धे, लढवय्ये, धर्मगुरू, कलाकार यांच्यापेक्षा दुय्यम मानण्याची मानसिकता प्राचीन आहे. सत्तासंघर्षात वैज्ञानिक, गणिती आणि वैद्यकीय क्षेत्रात जोरदार कामगिरी केलेली कित्येक ग्रीक, भारतीय, इजिप्शीयन विद्यापिठे इतिहासजमा झाली. पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही, असं प्रतिपादन केल्याबद्दल इटलीचा अवकाश संशोधक गॉर्डॕनो ब्रूनो याला सोळाव्या शतकात जीवंत जाळण्यात आलं होते. प्राचीन भारतात चार्वाकांच्या संस्कृतीचे अवशेषही मिळू नयेत, अशी खबरदारी घेण्यात आली.
       आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीमागे विश्वाचा एक नियम, एक कोडं लपलेलं असतं. आपल्या हसण्यात, रडण्यात, वाढण्यात अमर्याद सूत्रं असतात. त्या कोड्यांची उकल करण्यात जी मजा असते तिची जाणिव कधीही बहूतांश लोकांना होत नाही. उलटपक्षी, हातात मोबाईल, घरात टि.व्ही, फिरायला कार, उडायला विमानं देणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाविषयी निराधार आक्षेप दाखवण्यात मात्र आपण कमी पडत नाही.
      तत्वाधारीत राजसत्ता आणि ऐतखाऊ धर्मसत्तांच्या नादाने आपण पुन्हा एकदा आपली वैज्ञानिक प्रगती अज्ञानाच्या मातीत गाडायच्या दिशेने प्रवास करतो आहोत.. आणि माझ्यासारखे काहीजण -  जिथे प्रत्येक नागरीक शास्त्रशुद्ध तर्क (Logical reasoning) करू शकत असेल, केलेल्या धार्मिक अथवा वैज्ञानिक दाव्यांचं स्पष्टीकरण देणं बंधनकारक असेल, सामाजिक-आर्थिक सुरक्षा या जाति-धर्म-पंथ-प्रदेश यांच्या आधारावर न तोलता सारासार विवेकाने वितरण केल्या जात असतील, अशा एका व्यवस्थेत जगण्याचं स्वप्न पाहतात. जय विज्ञान!